शरद पवारांची गुगली? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीत भोजनाचे निमंत्रण

बारामतीमध्ये २ मार्च रोजी विद्या प्रतिष्ठान येथील १२ एकरच्या मैदानावर राज्य शासनाच्या वतीने नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शरद पवारांची गुगली? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीत भोजनाचे निमंत्रण

मुंबई : बारामतीमध्ये २ मार्च रोजी विद्या प्रतिष्ठान येथील १२ एकरच्या मैदानावर राज्य शासनाच्या वतीने नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत.  या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावे आहेत. मात्र, निमंत्रितांच्या यादीमधून राज्यसभेतील खासदार शरद पवार यांना वगळण्यात आले आहे. अशात पवारांनी एक गुगली टाकली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट बारामतीमध्ये असलेल्या आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. तसेच, शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सुप्रिया सुळे याना उपस्थित राहायला आवडेल, असेही नमूद केले आहे.

आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमत: येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे.बारामती येथील गोविंदबाग ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वी दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांना ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्विकार करावा, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा हा पहिलाच बारामती जिल्हा दौरा आहे. अशात पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शरद पवार यांना फोन करून आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिल्यामुळे हे नेते निमंत्रण स्वीकारतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in