नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणजे जपानी गुडिया आहेत. प्रत्येकाला वाटते ती आपल्यालाच डोळा मारते, असा उपरोधिक टोला शरद पवारांना लगावला आहे. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, शरद पवार ज्या कार्यकर्त्याकडे पाहतात त्याला वाटते तिकीट आपल्यालाच मिळणार. म्हणून तो कामाला लागतो, पण प्रत्यक्षात मात्र तिकीट भलत्यालाच मिळते, अशी खोचक टिप्पणी गडकरी यांनी यावेळी बोलताना केली.
मार्गदर्शन करताना गडकरी म्हणाले की, कार्यकर्त्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता स्वतःचे काम व्यवस्थित करावे. काही मिळाले तर बोनस समजावे आणि काही मिळाले नाही तर त्याचे दुःख वाटून घेऊ नये, पण नेत्यांपुढे चॉकलेट वाटण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार भविष्यात नक्कीच भाजपसोबत येतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. शरद पवारांनी सध्या भाजपसोबत येण्यास नकार दिला आहे, पण कालांतराने प्रत्येकाचे विचार बदलत असतात. राष्ट्रवादी पक्ष एकच आहे. कालांतराने पवारांच्या मनात देशकल्याणासाठी काय केले पाहिजे? असा विचार येईलच, असे बावनकुळे म्हणाले.