पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरणार? आदेश दिल्यास लढण्याची तयारी : उदयनराजेंना तगडे आव्हान

शरद पवार हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा तगडा नेता मैदानात उतरवून भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. स्वच्छ प्रतिमा आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव याच्या जोरावर साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरल्यास लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरणार? आदेश दिल्यास लढण्याची तयारी : उदयनराजेंना तगडे आव्हान
(संग्रहित छायाचित्र)

विशेष प्रतिनिधी/मुंबई

सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात शरद पवार ठरवतील तेच होते. परंतु, शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्याचवेळी भाजपने उदयनराजे भोसले यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे त्यांना तगडे आव्हान देणारा नेता कोण, हा शरद पवार यांच्यासमोर प्रश्न होता. त्यादृष्टीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाहिले जात असून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान, खुद्द चव्हाण यांनीदेखील साताऱ्यात सक्षम उमेदवार उतरविण्याबाबत चर्चा सुरू आहे. योग्यवेळी उमेदवार घोषित केला जाईल. असे सांगत एक प्रकारे मैदानात उतरण्यास तयार असल्याचे संकेत दिले.

त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे भोसलेंविरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी चुरशीची लढत होऊ शकते. मागच्या दोन दिवसांपासून साताऱ्यात महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरविण्याची चर्चा सुरू आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची आहे. या मतदारसंघात शरद पवार यांचा दबदबा आहे. परंतु, विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शविल्याने उदयनराजे भोसले यांना तोडीस तोड लढत देणारा नेता शरद पवार यांच्याकडे नाही. राष्ट्रवादीकडे पर्यायी उमेदवार म्हणून बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजीत पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची नावे पुढे आलेली आहेत. मात्र, या नेत्यांना मर्यादा आहेत, याची कल्पना खुद्द शरद पवार यांना आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार यांनाच साताऱ्यातून मैदानात उतरण्याची विनंती केली जात आहे. परंतु, शरद पवार यांनी आधीच निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी पर्यायी उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच मैदानात उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या पार्श्वभूमीवर रविवारी शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट कराडमध्ये जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. यामध्ये त्यांना साताऱ्यातून मैदानात उतरण्यावर चर्चा झाल्याचे समजते. खुद्द शरद पवार यांनीच तसा निरोप धाडला होता, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात सक्षम, तोडीस तोड लढत देणाऱ्या उमेदवाराबाबत सध्या चर्चा सुरू असल्याचे सांगतानाच जातीयवादी शक्तींच्या विरोधात आम्ही सक्षमपणे लढा देऊ, असे नमूद केले.

शरद पवारांनी आदेश दिल्यास मैदानात उतरू?

ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे उमेदवार ठरवण्याचा अधिकार शरद पवार यांना आहे. ते जो उमेदवार देतील, त्यांच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे उभे राहू. तसेच शरद पवार यांनी आदेश दिल्यास मैदानात उतरण्याचे संकेतही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. त्यामुळे साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

लढत अटीतटीची होण्याची शक्यता

उदयनराजे भोसले साताऱ्यात भाजपकडून मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत फूट पडल्याने शरद पवार यांच्यासमोर तोडीस तोड उमेदवार उतरविण्यास मर्यादा येत आहेत. मात्र, मतदारसंघात पवारांची ताकद मोठी आहे. त्यामुळे त्याच्या जोरावर शरद पवार हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा तगडा नेता मैदानात उतरवून भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. स्वच्छ प्रतिमा आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव याच्या जोरावर साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरल्यास लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in