शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सूत्रधार; अमित शहा यांचा हल्लाबोल, पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल याचे दिले संकेत

शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत हे मी ‘डंके की चोट पर’ सांगतो, अशी खरमरीत टीका भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

पुणे : शरद पवार यांनी देशात भ्रष्टाचार रुजवला आणि त्याला संस्थात्मक भ्रष्टाचाराचे स्वरूप दिले. शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत हे मी ‘डंके की चोट पर’ सांगतो, अशी खरमरीत टीका भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. भाजप सत्तेत येते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते, तर शरद पवारांचे सरकार आले की मराठा आरक्षण जाते, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे सूचक वक्तव्य करत राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे संकेत त्यांनी दिले.

पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात रविवारी अमित शहा बोलत होते. ते पुढे म्हणाले, विरोधक भ्रष्टाचाराची गोष्ट करतात, परंतु देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार (सरगना) आहेत. तुम्ही काय आरोप करत आहात? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचे काम कुणी केले आहे, तर ते शरद पवार यांनी केले आहे. मी ‘डंके की चोट पे’ हे सांगत आहे, असा घणाघात अमित शहा यांनी केला. “मी आज शरद पवारांना सांगायला आलोय. महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले. मध्यंतरी शरद पवार यांचे सरकार आले अन‌् मराठा आरक्षण गायब झाले. आम्ही पुन्हा आल्यानंतर आता पुन्हा मराठा आरक्षण देण्याचे काम केले आहे. शरद पवार यांचे सरकार येईल, तेव्हा मराठा आरक्षण पुन्हा गायब होईल. मराठा आरक्षण कायम ठेवायचे असेल तर कुणाचे सरकार आणले पाहिजे? समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम भाजपने केले आहे”, असे शहा म्हणाले.

उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील औरंगजेब फॅन क्लबचे नेते

“राज्यात औरंगजेब फॅन क्लब म्हणजे कोण? तर ते महाविकास आघाडीवाले आहेत आणि श्रीमान उद्धव ठाकरे हे या औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत”, असा घणाघात अमित शहा यांनी केला. “स्वत:ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणवणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत. उद्धवजी याकूब सोडवण्याची मागणी करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही बसला आहात. झाकीर नाईकच्या समर्थकांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात. संभाजीनगरचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. हा औरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्र आणि देशाला सुरक्षा देऊ शकतो का? देश आणि महाराष्ट्राला सुरक्षा ही केवळ भाजपच देऊ शकते”, असा दावा शहा यांनी केला.\

राज्यात भाजपच्या नेतृत्वात पुढील महायुतीचे सरकार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेत असेल. असे सांगताना मुख्यमंत्रीही भाजपचाच असेल, असे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. माझ्या बोलण्याचा नीट अर्थ समजून घ्या, असे आवर्जून सांगत भाजप कार्यकर्त्यांना अधिक मेहनतीचा सल्ला शहा यांनी दिला.

पवारांचे सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल

आम्ही २०१४ ला मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यानंतर मविआ सरकार आल्यानंतर आरक्षण गेले. आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल, असा टोला अमित शहा यांनी लगावला.

भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसले?

जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसले? राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारी झाले आहेत. आम्ही २४० जागा जिंकल्या आहेत. इंडिया आघाडीच्या सर्वांच्या मिळूनही तेवढ्या जागा नाहीत. आम्ही आज स्वर्गीय गिरीश बापट यांच्या या सभागृहात बसलोय. आज गुरुपौर्णिमा आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. राज्यात २०२४ मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि महायुतीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला.

शरद पवार नवनवे गैरसमज पसरवतात

“विरोधक म्हणाले, भाजप आरक्षण संपवत आहे. आम्ही उत्तर देताना काही ठिकाणी संकोच करत होतो. लोकांच्या मनात भ्रम निर्माण झाला. मी आज सांगायला आलो आहे की, १० वर्षांचे एक्स्टेन्शन नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मिळाले आणि पूर्ण बहुमत असतानाही आरक्षणाला बळ देण्याचे काम आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विरोधकांनी संविधानाचा विषय काढला, आम्ही उत्तर दिले. आता निवडणूक महाराष्ट्रात आली आहे. आता नव्या-नव्या प्रकारचे गैरसमज शरद पवार उभे करत आहेत, असा आरोप अमित शहा यांनी केला.

अमित शहा-अजित पवार भेट

पुण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट झाली. पुण्याच्या एका हॉटेलमध्ये दोघे भेटले. या चर्चेच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाकरे, पवार गटाचे आंदोलन

पुण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर "औरंगजेब क्लबचा हिरो" आणि शरद पवारांना "भ्रष्टाचाराचे सूत्रधार’ असल्याची टीका केली होती. या टीकेच्याविरोधात शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर जोरदार आंदोलन केले. अमित शहा यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "कोण कोणाला भ्रष्ट म्हणतेय याचा शोध घ्यावा लागेल. भाजपने वर्षभरापूर्वी आमच्या पक्षातील १२ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आज त्यातील बहुतांश नेते मंत्री आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यात काय चालले आहे, हे पाहावे लागेल, असे त्या म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in