"ज्यावेळी पक्ष धोक्यात येतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात," फडणवीसांची शरद पवारांवर टीका...

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. जेव्हा शरद पवारांचा पक्ष धोक्यात येतो, तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात, असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.
शरद पवार देवेंद्र फडणवीस
शरद पवार देवेंद्र फडणवीसप्रातिनिधिक फोटो

पुणे: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. जेव्हा शरद पवारांचा पक्ष धोक्यात येतो, तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात, असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच मोदींजींनी काल शरद पवारांना ऑफर दिली नाही. तो सल्ला होता, असंही फडणवीस म्हणाले. याशिवाय अरविंद केजरीवालांचा जामीन, राहुल गांधी तसेच विरोधी पक्षांची भूमिका, पुणे विमानतळ, स्मार्ट सीटी इत्यादी विषयांवरील पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली.

पक्ष कमजोर झाला की पवारसाहेब काँग्रेसमध्ये जातात...

फडणवीसांनी शरद पवारांवर टीका करत म्हटलं आहे की, "शरद पवार साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत त्यांनी पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. ते खरंही आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिलं तर समजतं की, ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला, त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले. तिथं जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडले."

ही ऑफर नाही, सल्ला आहे...

काल महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नंदुरबार येथे पार पडली. छोट्या पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंबंधीच्या शरद पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तसेच शिवसेना उबाठा गटाला खुली ऑफर दिली होती. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, "अनेक माध्यमांनी असं दाखवलं की मोदीजींची शरद पवारांना ऑफर. ही ऑफर नाही, सल्ला आहे. याचं कारण, मोदीजी काय म्हणाले? बारामतीच्या निवडणूकीनंतर पवार साहेबांना जेव्हा हे लक्षात आलं की , बारामतीची सीट अजित पवारांकडे चाललीये, तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की, चार जूननंतर क्षेत्रीय पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. त्यामुळं निवडणूकीचा निकाल काय आहे, ते पवार साहेबांना समजतो. मोदीजी म्हणाले, काँग्रेस डुबती नाव आहे, त्यामुळं तिकडं जाऊनही तुम्ही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत जावं आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं. तर कदाचित तुमचे मनसुबे पूर्ण होतील. याचा अर्थ ऑफर होत नाही. याचा अर्थ सल्ला होतो."

logo
marathi.freepressjournal.in