पुणे : शेजारी देशांनी काहीही केले तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे केले. त्यांनी सांगितले की, काश्मिरी जनतेने देशाचा अविभाज्य भाग असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना सरहद सारख्या संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हे मत शरद पवार यांनी ‘विजय धर ॲम्फी थिएटर’ च्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. हा उपक्रम काश्मीरमधील ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ विजय दुर्गाप्रसाद धर यांच्या नावावर सरहद ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज संस्थेच्या परिसरात उभारण्यात आला आहे. उद्घाटन सोहळा सरहद संस्थेच्या कात्रज परिसरातील गुजरवाडी येथील शैक्षणिक संकुलात पार पडला.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, विजय धर यांचे शिक्षण आणि सामाजिक कार्य काश्मीरमध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांनी उभारलेल्या शाळा आणि शैक्षणिक प्रकल्प सर्वोत्तम मानले जातात. सरहदने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ॲम्फी थिएटर उभारले आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे.
विजय धर यांनी सांगितले की, शरद पवार यांच्याशी त्यांच्या स्नेहामुळे बारामतीत त्यांच्या कार्याचे दर्शन घडले आणि त्यानंतर त्यांनी काश्मीरमध्ये शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न केला, ज्याला सरहदच्या माध्यमातून संजय नहार यांनी साथ दिली.
संजय नहार यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की, विजय धर यांचे कार्य शिक्षण, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची धुरा पुढे नेण्याचे आणि त्यांच्या आदर्शाला उजाळा देण्याचे उद्देशाने हा ॲम्फी थिएटर उभारण्यात आला आहे.
सोहळ्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विजय धर, त्यांची पत्नी कविता धर, कन्या कनिका धर, सरहद संस्थेचे संजय नहार, प्राचार्य सुषमा नहार, संतसिंग मोखा, डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, आर्किटेक्ट इम्रान शेख, वसंत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग
पुणे हे शिक्षण, उद्योग, संस्कृती आणि आयटी क्षेत्रातील आदर्श शहर असून, देशातील जनतेला एकत्र आणण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी येथे केले. विजय धर आणि सरहद संस्थांनी काश्मीरमधील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि सदैव राहील, असे शरद पवार यांनी म्हटले.