२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

यासंबंधी बुधवारी खुद्द पवार गटाच्या एका नेत्यानेच महत्त्वाचे विधान केल्यामुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यासंबंधी खुद्द पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनीही महत्त्वाचे विधान केल्यामुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाची निशाणी आणि पक्ष अजित पवारांच्या फुटीर गटाला दिल्यामुळे धक्का बसलेले राष्ट्रवादी पक्ष संस्थापक शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तत्पूर्वी, शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करुन काँग्रेससह एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा काँग्रेस हायकमांडने पवारांसमोर प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजते.

चव्हाण यांचा मंगळवारी भाजपप्रवेश झाल्यानंतर चेन्नीथला यांच्यासह नाना पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली. त्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर बुधवारी पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी माध्यमांसमोर याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. काँग्रेसमध्ये विलीन होणार का? हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे. पण चर्चा सुरू आहे. यासंबंधीचा निर्णय लवकरच सर्वांना कळेल, असे ते म्हणाले.

शरद पवार यांनी बुधवारी सकाळी आपल्या गटाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शरद पवार गटाचे सर्वच खासदार व आमदारांसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली, असा दावा केला जात आहे. यासंबंधीचा ठोस निर्णय शरद पवार आज किंवा उद्या घेतील असेही सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप खात्रीलायक वृत्त नाही.

logo
marathi.freepressjournal.in