शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; अनिल देशमुख, जयंत पाटील यांच्यावर आरोप

अवघ्या पंधरा दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन वेळा भेटले.
शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; अनिल देशमुख, जयंत पाटील यांच्यावर आरोप
संग्रहित साहित्य
Published on

रविकिरण देशमुख/मुंबई : अवघ्या पंधरा दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन वेळा भेटले. शनिवारच्या भेटीमागे दडलंय काय, याचे कयास राजकीय पंडितांकडून लावले जात आहेत. पण, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट आरोप झाल्याने शरद पवार अस्वस्थ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात राज्याचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री शिंदे यांनी हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केल्याचे कळते.

राजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अँटिलिया स्फोटके प्रकरणातील आरोपी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप केले. यामुळे शरद पवार हे अस्वस्थ झाल्याचे कळते. भाजपकडील गृह खात्याकडून देशमुख व पाटील यांच्याविरोधात कारवाईचे संकेत मिळत असल्यानेच पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे साकडे घातल्याचे कळते. कारण राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकीय हेतूने होऊ घातलेल्य कारवाईला आळा घालू शकतात, असे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितल्याचे कळते.

विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच अनिल देशमुख व जयंत पाटील यांच्यावर जर कारवाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मोठ्या राजकीय संकटात पडू शकते. येत्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात देशमुख यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, तर राज्याच्या विविध जिल्ह्यात जयंत पाटील हे पक्षाच्या प्रचारासाठी फिरत आहेत. त्यामुळे हे नेते अडचणीत सापडल्यास येणारी विधानसभा निवडणूक पक्षाला जड जाऊ शकते.

शरद पवार यांनी यापूर्वी २२ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यात सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक मदत मिळावी, याबाबत चर्चा झाली होती. महायुतीच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना १५९०.१६ कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विरोधी पक्षनेत्यांच्या ताब्यातील ११ साखर कारखान्यांना मदत देण्यात हात आखडता घेण्यात आला. या निर्णयाविरोधात पवार यांनी आंदोलनाचा इशाराही दिला.

दरम्यान, ‘एक्स’वर शरद पवार यांनी जाहीर केले की, मुख्यमंत्र्यांसोबत साखर कारखान्यांच्या सरकारच्या थकहमीबाबत व प्रलंबित विषयांवर चर्चा झाली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘एक्स’वर शरद पवार यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे जाहीर केले.

logo
marathi.freepressjournal.in