‘प’वार, पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसला २००४ मध्ये मुख्यमंत्रीपद मिळत होते, पण पक्षनेतृत्वाने ते काँग्रेसला दिले...
‘प’वार, पलटवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला २००४ मध्ये मुख्यमंत्रीपद मिळत होते, पण पक्षनेतृत्वाने ते काँग्रेसला दिले, असा आरोप करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना नुकतेच लक्ष्य केले होते. अजितदादांच्या या आरोपावर शरद पवारांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. पवार म्हणाले की, ‘त्यावेळी आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा नव्हता. म्हणून काँग्रेसला ते पद देण्यात आले. अजित पवार हे तेव्हा राजकारणात नवखे होते, तर छगन भुजबळांना मुख्यमंत्री केले असते तर पक्षात फूट पडली असती’.

पवार काय म्हणाले?

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे स्पष्ट केले असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ते म्हणाले की, ‘२००४ मध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेण्यात आला तो विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले नाही, कारण ते राजकारणात फारच नवखे होते. छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते, तर भविष्यात पक्षात फूट पडली असती’. शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे.

शरद पवारांमुळे माझे मुख्यमंत्रीपद राहिले - भुजबळ

काँग्रेस सोडली आणि मी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो. काँग्रेसमधील काही नेत्यांनी त्यावेळी मला मुख्यमंत्री करतो, असे आश्वासनदेखील दिले होते. दिल्लीला या, मुख्यमंत्री घोषित करतो, असे मला सांगण्यात आले होते. पण, मी शरद पवारांसोबत राहिलो. आमचे काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले, तेव्हा मी मुख्यमंत्री झालो असतो. पण, तेव्हा देखील शरद पवारांमुळे माझे मुख्यमंत्रीपद राहिले. मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हा पक्षात फूट पडली नाही, मग मुख्यमंत्री केले असते तर फूट पडली असती. या पवारसाहेबांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही, असा पलटवार मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर केला.

logo
marathi.freepressjournal.in