
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक संकटे आली, पण नाउमेद न होता पुढे नेण्याचे काम तुम्ही लोकांनी केले. पक्षात फूट पडेल, असे कधी वाटत नव्हते, पण ती पडली. मी त्याविषयी अधिक भाष्य करू इच्छित नाही, अशी खंत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. सध्या जे राहिले ते विचाराने राहिले आहेत. कोण गेले याची चिंता न करता, विचार आणि जनतेची बांधिलकी हीच पक्षाची खरी ताकद आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६वा वर्धापनदिन कार्यक्रम पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, “राज्यात येत्या दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, यामध्ये महिलांना ५० टक्के संधी देणार. मात्र या निवडणुका एकत्र लढवायच्या की स्वतंत्रपणे सामोरे जायचे, याचा निर्णय जिल्हा नेतृत्वाशी चर्चा करूनच घेऊ.”
या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह खासदार डॉ. अमोल कोल्हे, नीलेश लंके, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, रोहित पाटील, हर्षवर्धन पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची जयंत पाटलांची तयारी
माझ्या राजकीय जीवनात पवार साहेबांनी मला भरपूर संधी दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षांचा कालावधी दिला. परंतु, आता पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत दिले.