

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर आणि त्यांच्या अस्थींचे आज (दि. ३० जानेवारी) विसर्जन झाल्यानंतर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक कामात सक्रियता दर्शवली आहे. अस्थींच्या विसर्जनानंतर शरद पवार यांनी लगेच प्रदूषित नीरा नदीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि नदीच्या पाण्याच्या दयनीय अवस्थेबद्दल संबंधित यंत्रणा व अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
पुतण्याच्या निधनामुळे काही काळ खचलेले आणि भावूक दिसलेले शरद पवार आता पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आहेत. अनेक वर्षांपूर्वी स्थानिक कारभार बारामतीचा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवून स्वतः देशाच्या राजकारणात अधिक व्यस्त झाले होते. तेव्हापासून बारामतीचे अनेक प्रश्न अजित पवार हाच सुकर करत होते, पण त्यांच्या अपघाती निधनानंतर बारामती पोरकी झाल्याचे वातावरण तयार झाले होते.
या पार्श्वभूमीवर, पवार कुटुंबीयांनी बारामतीजवळील सोनगाव येथे अस्थींचे विसर्जन केल्यानंतर शरद पवार थेट बारामती शेजारील नीरा वाघज गावात पोहोचले. तिथे त्यांनी प्रदूषित नीरा नदीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि नदीच्या पाण्याची दयनीय अवस्था पाहून ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारींचा मागोवा घेतला.
शरद पवारांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून कामाला सुरुवात केल्यामुळे बारामती आणि त्यांच्या कुटुंबाचे जुने नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, त्यांनी तालुक्याची धुरा आपल्याकडे परत घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नवीन प्रकल्प राबवण्याच्या सूचना
ग्रामस्थांनी नदीच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतजमिनी खारट आणि पांढऱ्या पडत असून, नदीचे दूषित पाणीमुळे मजुरांना त्वचेचे विकार होत असल्याचे तक्रार पत्रकात नमूद केले. शरद पवारांनी पाहणी दरम्यान माळेगाव आणि सोमेश्वर येथील कारखान्यांच्या सांडपाण्याची प्रक्रिया करणाऱ्या ETP (Effluent Treatment Plant) आणि STP (Sewage Treatment Plant) प्रकल्पांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच, डेअरी आणि कत्तलखान्यांचे प्रक्रिया न केलेले पाणी थेट नदीत सोडू नये, यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या आणि नवीन प्रकल्प राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.