पुणे : सध्या विधानसभा निवडणुकीची उत्सुकता सर्वांना लागून राहिली असतानाच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदानासंबंधी आपला अंदाज वर्तवला आहे. माझ्या अंदाजानुसार, ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. तसेच १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला आहे.
“आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. निवडून येण्याची क्षमता बघितली जाईल. आघाडी असल्याने काही जागा सोडाव्या लागतील. काही जागा काँग्रेस आणि सेनेला द्याव्या लागतील. फक्त जागा सोडून चालणार नाही, त्यांचे कामही करावे लागेल. आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल घेऊन तुम्ही कामाला लागा, असे सांगत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले.
...त्यानंतर इच्छुक उमेदवारांबाबत निर्णय, प्रत्येक उमेदवार निवडून आणायचाय!
येत्या ८ ते १० दिवसांत जागावाटपाबाबतच्या गोष्टी संपवायच्या आहेत. आपली कमिटी तिचे म्हणणे मांडेल. त्यानंतर इच्छुक उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाईल. प्रत्येकाला वाटते आपल्या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून येईल, पण आघाडी म्हटल्यावर काही निर्णय घ्यावे लागतात. चर्चा करून जागा सोडली जाईल. नुसती सोडली जाणार नाही तर त्याचा प्रचार करून निवडूनही आणावे लागणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये वेगळे वातावरण आहे. लोकसभेला वेगळे चित्र होते. पंतप्रधान सांगत होते ४०० च्या वर जागा येतील. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादी चार आणि काँग्रेसचा एक खासदार आला. आता राष्ट्रवादीने १० जागा लढल्या, त्यातील ८ निवडून आल्या. लोकांचे मत कार्यकर्त्यांच्या मताशी संबंधित होते. म्हणून आपल्याला यश मिळाले. नेते आणि नागरिक यांचे मत वेगळे होते. बारामतीत अनेक नेत्यांनी भाषणे केली, आम्ही जागा जिंकणार असे सांगत होते. पण लोकांनी आणि तुम्ही ठरवले होते. १ लाख ५८ हजार मतांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली, याची आठवण शरद पवार यांनी करून दिली.
“योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन लोकांची कमिटी केली आहे. या कमिटीमध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे संजय राऊत या तीन नेत्यांना निर्णय घेण्याचा, शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन ही समिती सर्व्हे करणार आहे. जे लोक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबाबतचा लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो उमेदवार इच्छुक आहे, त्याला काही विचारले जाणार नाही. गावातील सामान्य लोकांची आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत,” असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, इंदापूर मतदारसंघात भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी हाती घेतील अशी चर्चा असतानाच, शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. “कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. निवडणुकीत ज्यांनी कष्ट केले, त्या कार्यकर्त्यांचे ऐकावे लागेल. इंदापूरमध्ये बदल घडेल असे वातावरण आहे,” असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
“तुम्हाला लोकसभेचे चित्र आठवत असेल. त्यावेळी वेगळे वातावरण झाले होते. ४००च्यावर जागा येतील, असे मोदी सांगत होते. अनेक राजकीय पक्षांचे नेते वेगळे आडाखे बांधत होते. पण महाराष्ट्रातील जनतेचा सूर वेगळा आहे, हे जाणवत होते. सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो, त्याची बांधिलकी मतदारांशी असते. आम्ही तीन पक्षांना एकत्र केले. मात्र महाविकास आघाडी एकत्र आली तरी त्यांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक निवडून येणार नाहीत, असे म्हटले जात होते. पण तरुण पिढी आणि कार्यकर्ता यांची सामान्य जनतेशी नाळ तुटली नाही, हे आम्हाला माहीत होते. त्यामुळेच आपला विजय झाला,” असेही पवार म्हणाले.