शरद पवारांचा ‘झेड प्लस’ सुरक्षेतील काही अटींना नकार, दिल्लीत ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्यांशी झाली बैठक

बैठकीत शरद पवारांनी ‘झेड प्लस’ सुरक्षेमधील काही अटी मला मान्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता शरद पवार केंद्र सरकार देत असलेली सुरक्षा नाकारणार असल्याची चर्चा आहे.
शरद पवार
शरद पवार
Published on

दिल्ली : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी ‘झेड प्लस’ सुरक्षेबाबत दिल्लीत सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शरद पवारांनी ‘झेड प्लस’ सुरक्षेमधील काही अटी मला मान्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता शरद पवार केंद्र सरकार देत असलेली सुरक्षा नाकारणार असल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांना केंद्र सरकारने ‘झेड प्लस’ सुरक्षा देऊ केली आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र ‘सीआरपीएफ’ जवानांची तुकडी तैनात असणार आहे. मात्र, या सुरक्षेतील काही अटी शरद पवारांच्या राजकीय हालचालींवर मर्यादा आणणाऱ्या असल्याने त्यांना या अटी मान्य नाहीत. यामुळे ते केंद्र सरकारची ‘झेड प्लस’ सुरक्षा नाकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी ‘सीआरपीएफ’चे डीजी स्वतः उपस्थित होते. त्यांनी शरद पवारांना या सुरक्षेसंबंधीची सविस्तर माहिती दिली. ‘झेड प्लस’ सुरक्षेत पवारांना सुरक्षा दलाचीच गाडी वापरण्याचा आग्रह करण्यात आला, मात्र तो पवारांना मान्य नाही. तसेच, घरात सुरक्षा कडे नसावे, अशी सूचना शरद पवारांनी केल्याचे समजते.

सुरक्षा पुरवण्याच्या हेतूबाबत पवारांना शंका

शरद पवार यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा मिळाल्यानंतर त्यांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या. देशात तीन लोकांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश आहे. यावर शरद पवार म्हणाले होते की, मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आहेत. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळविण्यासाठी ही व्यवस्था केलेली असावी.

logo
marathi.freepressjournal.in