"आम्हाला विधानसभा जिंकायची आहे, तुम्ही साथ द्या..." शरद पवारांनी कुणाला केलं आवाहन?

सत्ता बदलल्याशिवाय आपल्या पाहिजे तशी धोरणं घेता येत नाहीत. शेवटी सत्तेचा वापर ज्यांनी सत्ता दिली त्यांच्यासाठी करायचा असतो, असं शरद पवार म्हणाले.
"आम्हाला विधानसभा जिंकायची आहे, तुम्ही साथ द्या..." शरद पवारांनी कुणाला केलं आवाहन?

इंदापूर: शरद पवार तीन दिवसीय दुष्काळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी इंदापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आम्हाला विधानसभा जिंकून राज्य हातात घ्यायचं आहे, तुम्ही साथ द्या, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. सत्ता बदलल्याशिवाय आपल्या पाहिजे तसे निर्णय घेता येत नाहीत, असं शरद पवार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले की, "आम्ही इरिगेशन खात्याच्या लोकांशी बोलू, पण ते काही लगेच काही सांगणार नाहीत. त्यामुळं तुम्ही मला ५-६ महिने द्या. मला सरकार बदलायचं आहे. संस्थान बदलल्याशिवाय आपल्या पाहिजे तशी धोरणं घेता येत नाहीत. शेवटी सत्तेचा वापर ज्यांनी सत्ता दिली त्यांच्यासाठी करायचा असतो. त्यांना या सर्व गोष्टींच्या संबंधित किती रस आहे, मला समजू शकत नाही. त्यामुळं आज ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना आम्ही सांगू, विनंती करू. पण जर नाही घडलं, तर मला ५-६ महिन्याच्या नंतर ही धोरणं ठरवण्याचे अधिकार तुम्हा लोकांच्या हातात द्यायचेत. आणि कसं ठिक होत नाही बघू. आम्हाला विधानसभा जिंकायची आहे आणि राज्य हातात घ्यायचंय. त्याला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे."

विधानसभा निवडणूकीत ८५ जागा जिंकण्याचा निर्धार:

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं घवघवीत यश संपादन केलं. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं १० पैकी ८ जागा जिंकून सर्वांनाच अचंबित केलं. आता पक्षानं विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. नुकत्याच नगरमध्ये झालेल्या पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात पक्षानं ८५ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान शरद पवार यांनी गेल्या तीन दिवसांपासून दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. यानिमित्तानं त्यांनी आज इंदापूरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

logo
marathi.freepressjournal.in