Sharad pawar: कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवारांनी शड्डू ठोकला; म्हणाले, "रस्त्यावर आल्याशिवाय..."

शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांदवडमध्ये रास्तोरोको आणि महासभा होत आहे.
Sharad pawar:  कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवारांनी शड्डू ठोकला; म्हणाले, "रस्त्यावर आल्याशिवाय..."

केंद्र सरकारने कांद्याचे वाढते दर बघता दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. याचा थेट परिणाम हा कांद्याच्या दरांवर झाला. कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. आता कांदा प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार विरोधात शड्डू ठोकला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांदवडमध्ये रास्तोरोको आणि महासभा होत आहे. याच सभेतून पवारांनी सरकारवर निशाणा साधला.

सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नसून कांदा निर्यातबंदी करुन शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत असल्याचं पवार म्हणाले. कांद्याची निर्यातबंदी करुन शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत असल्याने कांदा निर्यातबंदी उठवलीच पाहिजे. आम्हाला रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण पण रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, असं देखील शरद पवार म्हणाले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, तुम्ही सगळे कष्ट करताय, पण सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही. ज्यांच्या हातात धोरण ठरविण्याचे अधिकार आहेत, त्यांचा जाण नसेल तर शेतकरी उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. मी मागे मनमाडला आलो होतो, तेव्हा काही शेतकऱ्यांनी मला सांगितलं की कांद्यासंदर्भात काही निर्णय केंद्र सरकार घेत आहे. त्यामुळे मी कार्यक्रम थांबवून तात्काळ दिल्लीला गेलो. त्यावेळी भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले होते. अध्यक्षांना याबाबत विचारलं असता कांद्याचे भाव खूप वाढल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कांद्याचे दर कमी करता येणार नाही का? असं अध्यक्षांनी मला विचारलं. यावेळी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतील तर मिळू द्या असं मी त्यांना सांगितलं असल्याचं पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in