तुम्ही तयार राहा! शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले,"आगामी निवडणुकांना..."

शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) दोन दिवसीय 'ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची' या शिबिरात ते बोलत होते.
तुम्ही तयार राहा! शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले,"आगामी निवडणुकांना..."

"मोदी सरकारला हटवण्यासाठी ठराविक कार्यक्रम 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून राबवावे लागणार आहेत. येत्या निवडणुकांना आपण सहकारी पक्षांना सोबत घेऊन सामोरे जाणार आहोत, त्या कामाला तुम्ही तयार राहा", असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) दोन दिवसीय 'ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची' या शिबिरात ते बोलत होते.

पवारांचे कार्यकर्त्यांना बळ-

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला महत्व देण्याचे काम देशात सुरु आहे. हिंदूत्वावर आधारीत फँसीझम त्यांना आणायचे आहे. त्यासाठी त्यांनी पाच कलमी कार्यक्रम हातात घेतला आहे, सर्व क्षेत्रातील खासगीकरण, नफेखोरीला प्रोत्साहन, मुस्लिम समाजाविरुद्ध द्वेश वाढवणे, स्वायत्त संस्थांवर ताबा ठेवणे, मनुवादी वर्चस्ववाद वाढविणे, धर्माच्या नावाखाली पाकिस्तान विरोधी आक्रमकता दाखविणे अशा, मुद्यातून भाजप जनतेसमोर वेगळे वातावरण तयार करीत आहे. मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होता. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का करावा, यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे, असेही पवार म्हणाले.

भाजपकडून सातत्याने आम्ही 400 पेक्षा जास्त जागा जिंकू असे सांगितले जाते. पण, देशाच्या दक्षिणेत भाजप बळकट नाही. देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही. तरीदेखील 450 जागा जिंकणार हे ते कोणत्या आधारावर सांगत आहेत, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक-

शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. शेतकऱ्यांवरील बोजा कमी करण्यासाठी धोरणे आखण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यावर काम होत नाही. एका बाजूने किंमत द्यायची नाही आणि दुसऱ्या बाजूने निर्यातीवर बंधने आणायची. शेतकरी आत्महत्येची संख्या लक्षणीय वाढली आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in