
कोल्हापूर : नरेंद्र मोदींचा ७५वा वाढदिवस झाला. हा दिवस कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५व्या वर्षात पदार्पण केले. मी त्यांना पत्र लिहिले आणि अभिनंदन केले. आम्ही सर्व यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढलो आहोत. अशा प्रसंगांमध्ये आम्ही कुठलेही राजकारण आणत नाही. अनेकांनी, देशातील आणि देशाबाहेरील नेतृत्वांनी मोदींना शुभेच्छा दिल्या त्या योग्यच आहेत. माझ्या ७५व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणले नाही, आम्हीही आणत नाही. देशासाठी काय करायचं असेल तर त्यांनी करावे एवढीच अपेक्षा. मी पंच्याहत्तरीनंतर थांबलो नाही, त्यामुळे पंतप्रधानांनी थांबावे, हे सांगायचा मला नैतिक अधिकार नाही. मी आता ८५ वर्षांचा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाविषयीही त्यांनी भाष्य केले. शरद पवार म्हणाले की, “हैदराबाद गॅझेट हे एक दिशा दाखवत आहे. मला याची प्रत मिळाली आहे. सामंजस्य रहावे, एकीची वीण कायम राहावी, असे सगळ्यांनाच वाटते. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, छगन भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावे यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे, हे घातक आहे. विखेंच्या समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत. मात्र, बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत. अशाने सामाजिक कटुता कशी कमी होईल. ऐक्य घडवायचे तर समित्यांत एकाच जातीचे लोक का? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला. परभणी, बीड, धाराशिवमध्ये मराठा-ओबीसींमध्ये कटुता वाढली. एकमेकांच्या हॉटेलातही जायचे नाही अशी कटुता वाढलीय.”
मतचोरीबाबत माझ्याकडे पुरावा नाही!
राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांवर शरद पवार म्हणाले की, “आमच्या पक्षाला लोकसभेला राज्यातील ४८ पैकी १० जागा मिळाल्या. पण तेच विधानसभेला आम्ही ११० जागा लढवूनही आम्हाला केवळ १० जागा मिळाल्या. आमचा एक उमेदवार गेली २५ वर्षे निवडून येतो. पण त्याचा पराभव झाला. या सगळ्यांमुळे शंका निर्माण होते, पण याबाबत माझ्याकडे पुरावा नाही.”
ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलेच - पवार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढेल का? याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, “स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सर्वत्र एकत्र लढेलच असे नाही. स्थानिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलेच आहे. मुंबई, ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद, शक्ती आहे. मुंबई, ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर काही नाही.”