मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या अवामानकारक पोस्टनंतर दोन्ही देशांमध्ये ताणाव निर्माण झाला आहे. अनेकांनी मालदीवच्या मंत्र्यांच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या प्रकरणी पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. देशाच्या पंतप्रधानांचा देशाबाहेर झालेला अपमान आम्हाला सहन होणार नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
देशाच्या पंतप्रधानांचा देशाबाहेर झालेला अपमान आम्हाला सहन होणार नाही. ते या देशाचे पंतप्रधान आहेत. आमच्यात देशांतर्गत अनेक मदभेद असतील. मात्र, त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यांचा मान ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे, असे शरद पवार मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
राम हा श्रद्धेचा विषय 'त्या' वक्तव्याची गरज नव्हती-
राम हा श्रद्धेचा विषय आहे, या देशाच्या जनतेच्या हृदयात रामाचे स्थान आहे आणि ते कायमच राहील यात काही सांगण्याची गरज नाही. जितेंद्र आव्हाड यांनी असे वक्तव्य करण्याची आवश्यकता नव्हती असे पवार म्हणाले. तसेच, मी राम मंदिराच्या निमंत्रणाची वाट बघत नाही. आता तसाही तिथे मेळावा आहे, त्यामुळे त्या गर्दीत मी जाणार नाही, जेव्हा योग येईल तेव्हा नक्की जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हा देश सेक्युलर -
सरकारी किंवा महानगरपालिकेच्या बऱ्याच शाळांमध्ये रामावर निबंध किंवा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत, याबद्दल शिक्षकांनी मला अर्ज केला आहे, अशा बद्दलचे कार्यक्रम शाळेत राबवणे हे योग्य नाही. मुंबईचे पालकमंत्री त्यासाठी खूप आग्रही असल्याचे मला समजले. हा देश सेक्युलर आहे, येथे सर्वधर्म समभाव यासंबंधीची भूमिका आहे. हिंदू किंवा राम यासंबंधीची आस्था जेवढी आहे, तेवढीच मुस्लिम, इस्लाम, मोहम्मद पैगंबर किंवा ख्रिश्चन धर्माच्या येशू यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आस्था आहे आणि त्यामुळे नव्या पिढीतल्या मुलांवर या प्रकारची भूमिका मनामध्ये बिंबवणे हे सेक्युलर देशामध्ये योग्य नाही.