शरद पवारांचे विश्वासू नेते भुजबळांच्या भेटीला, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत असून राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेते आजही मंत्री शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

हारून शेख/लासलगाव

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत असून राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेते आजही मंत्री शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यातच बुधवारी नाशिक जिल्ह्यातील शरद पवार यांचे निकटवर्तीय नेते श्रीराम शेटे यांनी राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले असले तरी छगन भुजबळ या भेटीबाबत काय मत मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

काही दिवसांपूर्वी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेटे यांच्या साखर कारखान्याला भेट दिली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. त्यानंतर शेटे यांनी थेट मंत्री भुजबळ यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेले श्रीराम शेटे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असून ते पवारांचे निकटवर्तीय नेते देखील आहेत. त्यामुळे अर्धातास बंद दाराआड झालेल्या चर्चेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही. तसेच शेटे यांच्या निकटवर्तीयांनी देखील भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांना उमेदवारी मिळून देण्यापासून ते निवडून आणण्यात श्रीराम शेटे यांचा मोठा वाटा आहे.

राज्यपाल सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले होते, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला असताना भुजबळ यांनी भेट टाळली होती. त्यामुळे चर्चेत असलेले भुजबळ हे जाहीरपणे वक्तव्य करीत नसले तरीही ते महायुतीमध्ये आनंदी नसल्याचे त्यांनी घेतलेल्या विविध भूमिकांमधून दिसून येत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी देखील भुजबळांनी येवला मतदारसंघातील विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या नाशिकमधील सिन्नर, निफाड, दिंडोरी या ठिकाणच्या कार्यक्रमात देखील भुजबळ सहभागी झाले नव्हते.

भुजबळ आणि शेटे यांच्यात भेट झाल्याने काही नवीन राजकीय घडामोडी घडतात की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मात्र अस्वस्थता पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in