
मुंबई : झारखंडचे राज्यपाल असताना, राधाकृष्णन यांच्या कार्यकाळात आदिवासी समाजातील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनातच अटक करण्यात आली. सोरेन यांनीअटक करू नये अशी विनंती केली होती, तरीही ही घटना घडली. त्यामुळे संस्थांविषयी त्यांचा दृष्टिकोन आणि प्रतिष्ठेचे भान स्पष्ट होते. आता अशा व्यक्तीला उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी रेड्डी यांची भेट घेतल्यानंतर म्हटले.
राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. पवार म्हणाले की, मागील उपराष्ट्रपतींनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच दिलेला राजीनामा अनुत्तरित प्रश्न निर्माण करतो आणि त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
विरोधक एकमताने रेड्डींच्या पाठीशी उभे असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. न्यायाधीश म्हणून त्यांच्या कार्यकाळातील निर्णय सामान्य नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी हा अभिमानाचा विषय आहे. विजय-पराजय गौण आहे, परंतु पदाची प्रतिष्ठा टिकवणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा फोन
पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एनडीएच्या उमेदवारासाठी पाठिंबा मागत फोन केला होता. त्यांचा एकच युक्तिवाद आहे- उमेदवार महाराष्ट्राचा राज्यपाल आहे. त्यामुळे सर्वांनी त्याला मत द्यावे. पण आमच्यासाठी तो मुद्दा नाही, असे ते म्हणाले.