तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडेल, शरद पवार यांचा सरकारला इशारा

आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचे उद‌्घाटन करताना शरद पवार बोलत होते.
तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडेल, शरद पवार यांचा सरकारला इशारा

मुंबई : राज्यामध्ये युवकांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. परंतु सरकारचं त्याकडे अजिबात लक्ष नाही. शिक्षण क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. शिक्षकांची लाखो पदे रिक्त आहेत. ती भरली जात नाहीत. एकीकडे शाळा सुरू आहेत, तर दुसरीकडे शिक्षक नाहीत, अशी अवस्था आहे. तरुणांनी या प्रश्नांची सरकारला जाणीव करून द्यावी, असे आवाहन करतानाच तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास सरकारला महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिला. आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचे उद‌्घाटन करताना शरद पवार बोलत होते.

महाराष्ट्रातील तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आमदार रोहित पवार पुणे ते नागपूर अशी 'युवा संघर्ष यात्रा' काढणार आहेत. राज्यातील १३ जिल्ह्यांत ८०० किलोमीटरचा ते पायी प्रवास करणार आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या यात्रेची सांगता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी नागपुरात होणार आहे.

शांततापूर्ण लोकशाही मार्गाने ही यात्रा काढणाऱ्या तरुणांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करू शकत नाही. सरकारने तसा प्रयत्न केल्यास त्याची सत्ताधाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी त्यांनी काढलेल्या दिंडी यात्रेला उजाळा दिला. ते म्हणाले, मी जळगावपासून शेतकरी दिंडी काढली होती. नागपूरच्या अधिवेशनात दिंडी नेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. आज त्याहीपेक्षा मोठी यात्रा निघतेय. ही दिंडी नव्या पिढीची आहे. नव्या पिढीला प्रोत्साहन देणारी आहे.

शाळा दत्तक योजना मागे घ्यावी, परीक्षेतील पेपरफुटीच्या विरोधात कायदा लागू करावा, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करावी आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफ करावे, आदी मागण्या या निमित्ताने सरकारपुढे ठेवण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in