शाहू महाराजांना पवारांकडून लोकसभेची ऑफर? भेटीनंतर केले सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली.
शाहू महाराजांना पवारांकडून लोकसभेची ऑफर? भेटीनंतर केले सूचक वक्तव्य
Published on

कोल्हापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावेळी शरद पवार यांनी शाहू महाराजांना कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेची ऑफर दिल्याचे समजते. शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर आनंदच होईल, असे सूचक वक्तव्य पवारांनी नंतर माध्यमांशी बोलताना केले. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेमुळे कोल्हापूरच्या खासदारकीच्या जागेविषयी राजकारणात रंगत निर्माण झाली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आजची भेट महत्त्वाची मानली जात होती.

या भेटीनंतर शरद पवार यांनी लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांवर बोलत असताना शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर आनंदच होईल, असे सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची शाहू महाराजांच्या बद्दल उमेदवारीबाबतची पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली आहे. शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल असे पवार यावेळी म्हणाले.“महाविकास आघाडी कडून लोकसभेच्या ३९ जागांवर एकमत झाले आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबत्त सुरू आहेत. मी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ. महायुतीच्या जागावाटपाबाबत मला काही कल्पना नाही. भाजप देशात ४०० पेक्षा जास्त आणि राज्यात ४० पेक्षा जास्त जागा जिंकू, असे सांगत आहे. पण ते खूप कमी आकडे सांगताहेत, असे मला वाटते,’’ अशी खोचक टीकाही त्यांनी केली. 

logo
marathi.freepressjournal.in