मुंबई : आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. निरुपम यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
निरुपम म्हणाले, एका मुलाखतीत शरद पवार संकेत देत आहेत की, आगामी काळात प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत. शरद पवारांच्या भविष्यवाणी मागे त्यांची एक योजना आहे. मी याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये एनसीपी विलीन होण्यासाठी प्रयत्न देखील केले होते. दिग्विंजय सिंह यांनी अधिकृतरित्या याबाबत वक्तव्य देखील केले होते की, शरद पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत. याबाबत शरद पवारांनी काँग्रेसकडे प्रस्ताव देखील ठेवला होता. पण, यात महाराष्ट्राची धुरा मुलगीकडे ( सुप्रिया सुळे) देण्यात यावी, अशी अटही त्यांनी ठेवली होती. त्यामुळे विलिनीकरणाचा कार्यक्रम आजही प्रलंबित आहे, असे निरुपम यांनी सांगितले.
शरद पवार आणि काँग्रेस पक्ष तोट्यात
"बारामती शरद पवारांच्या हातातून निघून जात असल्याचे त्यांना दिसत आहे. त्यामुळे आपल्या मुलीचे पुनर्वसन करण्यासाठी ते कदाचित असा कार्यक्रम तयार करत असल्याचे मला वाटते. या विलीनिकरणमुळे शरद पवार आणि काँग्रेस पक्षाला काही फायदा होणार नाही, असेही मला वाटते. कारण ते दोन्ही पक्ष तोट्यात चालले आहेत. जेव्हा दोन शून्य एकत्र येतात. तेव्हा मोठा शून्य तयार होतो. यातून काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाला काही फायदा होणार नाही. पण, त्यांची धडपड सुरू आहे", असे निरुपम म्हणाले.