"मतदानाला जाताना घरी गॅस सिलेंडरला नमस्कार करा" असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१३ मध्ये एका प्रचारसभेत मतदारांना केले होते. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आणि महागाईवरून घेरत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हल्लाबोल केला.
"मतदानासाठी जाताना घरातील गॅस सिलेंडरला नमस्कार करा...हे सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी केलेलं आवाहन आता आपण सर्वांनी तंतोतंत पाळायला हवं आणि गॅस सिलेंडर महाग करणाऱ्या मोदी सरकारला त्यांचंच हे आवाहन खरं ठरवून दाखवायला हवं", अशी पोस्ट पवार गटाने एक्स(आधीचे ट्विटर)वर केली आहे.
अजून एका पोस्टमध्ये, "लक्षात ठेवा, गॅस सिलेंडर दरवाढीचा भडका उडालाय. तो शमवायचा असेल तर मोदींनी केलेलं वक्तव्य खरं ठरवून दाखवायला हवं! भाजपला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखायला हवं!" असे कॅप्शन देत मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच, मत देताना वाढत्या महागाईचा आवर्जुन विचार करा असेही म्हटले आहे. मतदानाला जाताना घरातील सिलेंडरला नमस्कार करा असे मोदींनी केलेले २३ नोव्हेंबर २०१३ मधील एक ट्विटही पोस्टमध्ये जोडले आहे. तसेच मोदींचा फोटो देखील टाकला असून 'मतदारांनो, २०१३ सालच्या या ढोंगीपणाला विसरू नका', असेही म्हटले आहे.
दरम्यान, शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी (२५ एप्रिल) पक्षाचा जाहीरनामा म्हणजे 'शपथनामा' प्रसिद्ध केला. यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती ५०० रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. नुकतेच शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात त्यांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारसभेतील भाषणादरम्यानही मोदींचा, मतदानाला जाताना सिलेंडरला नमस्कार करून जा, हाच ऑडिओ ऐकवला होता.