‘शासन आपल्या दारी’ला टक्कर ‘जनाधिकार’ जनता दरबाराची

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्रास देणारा आहे. नागरिकांना बळजबरी या कार्यक्रमास बोलविले जाते.
‘शासन आपल्या दारी’ला टक्कर ‘जनाधिकार’ जनता दरबाराची

प्रतिनिधी/मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला प्रत्युत्तर म्हणून विरोधी पक्षाच्या वतीने ‘जनाधिकार’ जनता दरबार हा अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या माध्यमातून शासन आपल्या दारी या योजनेचे अपयश लोकांसमोर मांडणार आहेत.

सध्या महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम संपूर्ण जाहिरातबाजी आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा उपक्रम असून प्रत्यक्षात राज्यातील नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही. राज्य सरकार या कार्यक्रमात निव्वळ विविध लोकप्रिय घोषणा करत आहे. त्यामुळे या अपयशी कार्यक्रमाची सत्यता आम्ही जनतेसमोर मांडणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

राज्यव्यापी ‘जनाधिकार जनता दरबार’ या कार्यक्रमाची सुरुवात येत्या १० जानेवारीपासून मुंबईतील शिवसेनेचे (ठाकरे गट) राज्य संपर्क कार्यालय असलेल्या ‘शिवालय’ येथून होईल. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील नागरिकांनी मंत्रालय तसेच इतर शासकीय कार्यालयात असलेल्या प्रलंबित प्रकरणांबाबत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दानवे यांनी केले आहे.

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्रास देणारा आहे. नागरिकांना बळजबरी या कार्यक्रमास बोलविले जाते. जनतेचा हक्काचा पैसा नाहक वाया घालवला जात असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नुसते भाषणबाजी करतात. त्यांच्या या बोलघेवड्या कामकाजाचा भांडाफोड करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in