तुर्भे: माझी पक्षातील निवड ही माझ्या माथाडी चळवळीतील योगदानामुळेच झाली आहे. मी आक्रमक आहे, संघटनेच्या माध्यमातून पक्षाला मदत केली आहे. त्यामुळेच मला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार मनोज जामसुतकर यांचाही गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि पांडुरंग मूर्ती देऊन दोघांचा सन्मान करण्यात आला. शिंदे म्हणाले, “पक्ष फुटला तेव्हा मला मंत्रीपदाची संधी होती. पण मी निष्ठावान राहिलो, शरद पवार यांचा साथ सोडला नाही. म्हणूनच आज मी या पदावर पोहचू शकलो. माथाडी चळवळीच्या मुद्द्यांवर आम्ही नेहमीच सर्वपक्षीय एकत्र आलो आहोत. कामगार कायदा दुरुस्तीच्या वेळी याचा अनुभव घेतला आहे.”
त्याचवेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, बाजार समितीची जागा प्रधानमंत्री गृह प्रकल्पासाठी वापरण्याचा निर्णय केवळ निवडणूक फंडासाठी तर घेतला नाही ना? आमदार मनोज जामसुतकर यांनी कामगारांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. निवडणुकीत कोण मित्र आणि कोण शत्रू हे समजले. कामगारांच्या प्रश्नांना आवाज देणार, असे ते म्हणाले.
माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले, भाजप नेत्यांनी चळवळीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. गुंडगिरी थांबवली. मात्र सरकारवर वारंवार टीका केल्यास कामगारांचे प्रश्न दुर्लक्षित होतील. उद्धव ठाकरे यांच्या काळात मात्र माथाडी कामगारांना न्याय मिळाला नाही.
या समारंभाला युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, गुलाबराव जगताप, चंद्रकांत पाटील, दिलीप खोंड, रविकांत पाटील, सुर्यकांत पाटील, ॲड. भारतीताई पाटील, गुंगा पाटील, विठ्ठल धनावडे, बाजीराव धोंडे आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी प्रतिनिधी व मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते.
३१ जुलैला महापालिकेवर मोर्चा
कोपरखैरणे आणि घणसोलीतील माथाडी कामगारांच्या घरांना अनधिकृत बांधकामाच्या नोटिसा महापालिकेकडून आल्या आहेत. या विरोधात ३१ जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. शिंदे म्हणाले की, “ट्रक टर्मिनलची जागा आम्ही दिली नसती, तर सिडकोने तिथे घर बांधता आली नसती. मात्र या घरांचे दर खूप जास्त आहेत. सभागृहात पाठपुरावा करून ते कमी करण्याचा प्रयत्न केला असून ही घरे ३०-४० लाखांत मिळावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”