भुजबळांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर विरोध करावा; कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी जळगावात पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, कॅबिनेटमध्ये निर्णय होत असताना भुजबळ बाहेर येऊन विरोध का करतात? जर अन्याय होत असल्याचा भाव असेल, तर भुजबळांनी प्रथम मंत्रीमंडळाचा राजीनामा द्यावा आणि नंतर विरोध करावा.
भुजबळांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर विरोध करावा; कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची टीका
PM
Published on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी जळगावात पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, कॅबिनेटमध्ये निर्णय होत असताना भुजबळ बाहेर येऊन विरोध का करतात? जर अन्याय होत असल्याचा भाव असेल, तर भुजबळांनी प्रथम मंत्रीमंडळाचा राजीनामा द्यावा आणि नंतर विरोध करावा. आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा नसून भावनिक आहे, तो दोन्ही समाजांचा विश्वास मिळवून शासनाने हाताळावा.

शिंदे यांनी महायुतीविषयी बोलताना म्हटले की, महायुती एकत्र असल्याचे दाखवले जाते, परंतु त्यात प्रचंड स्पर्धा आहे आणि प्रत्येक पक्ष कुरघोडी करत असल्याने राज्याचा विकास ठप्प झाला आहे. शिंदे यांनी टीका केली की, देशात आणि राज्यात सत्तेच्या बळावर विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या शेतकरी विरोधी सरकारला शेतकरीच घरबसवतील, असे त्यांनी म्हटले.

जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका करताना सांगितले की, अनेक प्रश्न आहेत, कापसासह केळीचा भाव, विकास थांबला, कायदा सुव्यवस्था आणि सत्तेचा गैरवापर या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्यात येईल. तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी दुसरे आंदोलनही केले जाईल. शिंदे यांनी आरोप केला की, जळगाव शहरात केवळ गुंड पोसण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, नागरिक त्यास सहन करत आहेत.

शिंदे यांनी तरुणांना सूचित केले की, शरद पवार गटाकडून जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांमध्ये संधी मिळाली आहे. काही जण पक्ष सोडल्यामुळे गाडी रिकामी झाली आहे. माजी मंत्री सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर हा गट सोडून अति पवार गटात गेले. शिंदे म्हणाले की, जे लाभार्थी गेले, त्यांना परत घेण्यात येणार नाही जोपर्यंत त्यांनी पश्चाताप केला नाही. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष शिंदे नंदुरबारसाठी रवाना झाले. रस्त्यात धरणगाव, अमळनेर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.

महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक

आरक्षणावरील सरकारची भूमिका न्यायाची असेल तर राज्यातील हा प्रश्न सुटू शकतो, परंतु राजकारणात विविध प्रश्न हे चिघळत ठेवले जातात. त्यामुळे दोन्ही समाजांचा विश्वास मिळवून काम करावे. त्यांनी लक्षात आणून दिले की, पूर्वी नेते महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा करत होते, आता समाजाची चर्चा करताना दिसत आहेत. आगामी निवडणुकांबाबत शिंदे यांनी सांगितले की, सध्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून राज्यात निवडणूक लढवली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in