षडयंत्र रचल्याने अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा दावा

अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या आणि खोटे षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजित पवारांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रातील लेखात केला आहे.
शशिकांत शिंदें
शशिकांत शिंदें संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर आम्ही सर्व अजित पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व देणार होतो, पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे दादांचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठे करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. राष्ट्रवादीचे विलीनीकरण घडवून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. मात्र, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिंदेंच्या या लेखावर आक्षेप घेतला आहे.

अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या आणि खोटे षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजित पवारांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी लेखात केला आहे. पण झालेली चूक आता दुरुस्त करायची, या विचाराने दादा गेल्या चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे, असा निर्धार करुन ते जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करत होते. त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादीची युती घडवून आणली होती, असेही शिंदे यांनी लेखात नमूद केले आहे.

अजितदादा स्वतः हिरीरीने प्रचाराची धुरा सांभाळत होते. १२ जानेवारीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व धुरा अजित पवारांकडे सुपूर्द करण्याचा निर्णयसुद्धा शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी घेतला होता, असे शशिकांत शिंदे यांनी या लेखात म्हटले आहे.

सुनील तटकरेंचा आक्षेप

शशिकांत शिंदेच्या लेखावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘त्यांनी लिहिलेले अत्यंत चुकीचे आणि गैरलागू आहे. अशा प्रकारचे लिखाण त्यांनी करू नये. अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या आणि खोटे षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे दादांनी निर्णय घेतला, असे ते यापुढेही बोलत राहतील तर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देईन, असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in