पुणे : पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेंढपाळ आपल्या मेंढ्या त्यांची कोकरे, कुटुंबाच्या सदस्यांच्या जेवणाचे साहित्य, पाळीव कुत्रे, कोंबड्या, घोड्यांच्या पाठीवर लादून चारा आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत फिरत असल्याची स्थिती आहे.
पावसाळा संपताच घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या जेवण-पाण्याची सोय करून मेंढपाळ कुटुंब मेंढ्यांच्या चारा आणि पाण्याच्या शोधात शेकडो मैल पायपीट करत जातात. परंतु यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दांडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घराचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे. कारण मेंढ्या जगण्यासाठी ज्या भागात पाऊस पडला आहे त्या भागात या मेंढपाळांना चाऱ्याच्या शोधात निघावे लागले आहे. दरम्यान, सध्याला घराजवळ येऊन पुन्हा घरच्यांना विसरून चारापाण्याच्या शोधात जावे लागत असल्याने घरातील वयोवृद्ध व्यक्तींना गहिवरून आले असल्याचे चित्र पाहायला मिळते. परंतु कुटुंबीयांपेक्षा मुक्या प्राण्यांचा जीव महत्त्वाचा माणूस घोड्याच्या पाठीवर संसार उपयोगी साहित्य लाधुन ते शेकडो मैलांच्या प्रवासासाठी निघाले आहेत. सलग दुसऱ्या वर्षीची दिवाळी घरापासून दूर साजरी करण्याची वेळ मेंढपाळ कुटुंबावर आली आहे.
चालू वर्षी सुरुवातीलाच पावसाळ्यात पहिल्यापासून पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला. पाळीव जनावरांनाही सध्या चारा टंचाई भासत आहे. त्यातच मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चाऱ्याच्या शोधात घेऊन जात असतात. परंतु पाऊस न झाल्याने माळरानावर कुठे मेंढ्यांसाठी चारा उपलब्ध नसल्याची सध्याची स्थिती पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच मेंढपाळ कुटुंबीय मेंढ्यांना घेऊन चाऱ्याच्या शोधात गावोगावी भटकंती करताना दिसतात. मेंढपाळ सध्या घराचा रस्ता धरत असतानाच गावाकडेही चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने ज्या भागात पाऊस पडला आहे त्या भागाकडे मेंढपाळ कुटुंबियांनी आपला मोर्चा वळविला असल्याचे चित्र पहायला मिळते.