बीएलओ एसआयआर ड्युटीविरोधात शिक्षक भारती करणार आंदोलन

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीएलओ एसआयआर ड्युटी देण्यात येत असल्याने याला शिक्षण क्षेत्रातून विरोध होत आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी करण्यात येत आहे.
बीएलओ एसआयआर ड्युटीविरोधात शिक्षक भारती करणार आंदोलन
बीएलओ एसआयआर ड्युटीविरोधात शिक्षक भारती करणार आंदोलन'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीएलओ एसआयआर ड्युटी देण्यात येत असल्याने याला शिक्षण क्षेत्रातून विरोध होत आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत प्रशासनातर्फे याबाबत चर्चा करण्यास वेळ न दिल्यास मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला आहे.

बीएलओ ड्युटी अन्याय निवारण मंचच्या वतीने नंदादीप हायस्कूल, गोरेगाव येथे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक भारती, बृहन्मुंबई शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची जाहीर सभा शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना सुभाष मोरे यांनी हा इशारा दिला.

याप्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी शाळा सुरू झाल्यानंतर शिकवू पाहणाऱ्या शिक्षकांना अशैक्षणिक कामात जुंपणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करणारा एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांना शक्य झाले नाही. पण नीतिमत्तेच्या चौकटीत राहून आम्हाला शिकवू द्या, अशी मागणी करणाऱ्या शिक्षकांवर एफआयआर दाखल करण्याची हिंमत कशी होते? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच द शिक्षण मंडळ गोरेगावचे उपाध्यक्ष गिरीश सामंत यांनी बीएलओ विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत सविस्तर विवेचन करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी न्यायालयीन लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तर अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय नाईक यांनी शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करून सुशिक्षित बेरोजगारांना मानधन तत्वावर काम दिल्यास काही कोटी रुपयात संपूर्ण काम होऊ शकते, अशी आकडेवारी सभागृहात जाहीर केली. तसेच अनुदानित शिक्षण व्यवस्था संपवण्याचे हे षडयंत्र असून सर्व राजकीय पक्ष यात सहभागी असल्याचे सांगितले.

हे सरकारचे कटकारस्थान -पंडागळे

बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या देवीदास पंडागळे यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्रास देणे हे सर्व मिलीजुली सरकारचे कटकारस्थान असल्याचे सांगितले, तर शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या शासनाच्या कृतीचा निषेध व्यक्त केला. तसेच याप्रश्नी मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला.

logo
marathi.freepressjournal.in