
कोकणी माणूस आपल्या घरापासून कितीही लांब असला तरी आपल्या परंपरा आणि संस्कृती विसरत नाही. गणपती असो किंवा शिमगा असो कोकणी माणूस आवर्जून वेळ काढतो व आपले परंपरागत सण साजरे करण्यासाठी कोकणात जातो. कोकणात शिमगा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील लोक शिमग्यानिमित आपल्या जात आहेत. कोकणातील राजकारणी सुद्धा याला अपवाद नाहीत, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना वेळात वेळ काढून कोकणातले आमदार, मंत्री, राजकारणी शिमगोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावाकडे गेल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना उबाठाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चिपळूण तालुक्यातील त्यांचे मुळगाव तुरुंब येथे शिमगोत्सव साजरा करण्यासाठी पोहचले आहेत. ते लहानपणापासून दरवर्षी शिमगोत्सव साजरा करतात. पहाटे प्रथेनुसार होम आणि पूजा झाल्यानंतर गावकऱ्यांकडून देवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली जाते, भास्कर जाधवही दरवर्षी या सोहळ्यास आपली उपस्थिती लावतात. याही वर्षी आमदार भास्कर जाधव अतिशय उत्साहाने गावकऱ्यांसोबत या सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत. तसेच भास्कर जाधव या सोहळ्यात देवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना पाहायला मिळत आहेत.
काय आहे पालखी सोहळा?
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोकणात शिमगा मोठ्या उत्साहात आहे. पालखी सोहळा गावच्या मंदिरातून ढोलताशांच्या गजरात निघतो. ही पालखी प्रत्येक घरात नेण्यात येते घरातील महिला या पालखीची पूजा करतात आणि ग्रामदेवतेची ओटी भरतात. कोकणात प्रसिद्ध असलेला पालखी उत्सव पाहण्यासाठी अनेक लोक कोकणात येतात. महाराष्ट्रात बऱ्यापैकी या सणाला होळी म्हणतात पण कोकणात या सणाला शिमगा म्हणले जाते. ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद सर्वांना असतो. त्यामुळे देवीला गोड नैवेद्य दाखवला जातो. गावातील प्रत्येक घरात नेण्यात आलेला पालखी सोहळा पार पडल्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा केला जातो.