टाटा एअरबसवरून चिखलफेक ; प्रकल्प गुजरातला गेल्याने सत्ताधारी-महाआघाडीचे एकमेकांवर खापर

वेदांत-फॉक्सकॉन हा २ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला होता. तेव्हा देखील राज्यात गदारोळ झाला होता. आता टाटा एअरबस हा २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला
टाटा एअरबसवरून चिखलफेक ; प्रकल्प गुजरातला गेल्याने सत्ताधारी-महाआघाडीचे एकमेकांवर खापर

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे या सगळ्यांनीच सरकावर टीका केली आहे. नाना पटोले यांनी तर महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत, हे स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रकल्प एका वर्षापुर्वीच गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय झाला होता, असे स्पष्ट केले आहे.

वेदांत-फॉक्सकॉन हा २ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला होता. तेव्हा देखील राज्यात गदारोळ झाला होता. आता टाटा एअरबस हा २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे. या सरकारच्या काळात वेदांता फॉक्सकॉनचा २ लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. बल्क ड्रग पार्क प्रकल्पही राज्याबाहेर गेला. त्यानंतर आता टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रूपयांचा प्रकल्पही गुजरातला गेला. राज्यात सरकार बदलल्यापासून तीन महिन्यात तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता निर्लज्जपणे हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला असे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले, वेदांता गेल्यानंतर उद्योगमंत्री म्हणाले होते, की याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आणू, पण मोठा तर जाऊ देच पण आता हा दुसराही गेला. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. त्याने राज्यालाच फायदा होणार होता. राज्य सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातून चार प्रकल्प गेले आहेत. एअरबसबाबत एमओयू झाला होता असे म्हणत आहेत तर त्यांनी एमओयू दाखवावा. या सरकारने दहिहंडी, राजकीय भेटी, फोडाफोडी या व्यतिरिक्त काहीही केलेले नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांनी काहीही आणलेले नाही. कृषिमंत्री कोण हे शेतकऱ्यांना माहिती नाही. उद्योजकांना उद्योगमंत्री माहिती नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारही त्यांचे पण इंजिन फेल का होत आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मंत्री दिशाभूल करत आहेत-सुप्रिया सुळे

राज्य सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात याचा अर्थ सरकारमध्ये ताळमेळ नाही किंवा हे मंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत. मेरीटवर प्रकल्प येत असताना असे काय घडले की तिन्ही प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचे कारण काय, हे सत्य नागरीक म्हणून जाणून घेण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

आपल्या युवकांनी फक्त आरत्याच करायच्या काय?

‘‘एअरबस प्रोजेक्टचं काम टाटा ग्रुपला मिळाल्यानंतर मी टाटांना पत्र पाठवून हा प्रकल्प नाशिकमध्ये व्हावा,’’ अशी मागणी केल्याचं छगन भुजबळ यांनी शुक्रवारी सांगितले. ‘‘एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला जात आहेत, ही गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत वजन आहे. त्यांनी असे प्रकल्प महाराष्ट्रात राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या युवकांनी फक्त दहिहंडी, आरत्या, हनुमान चालिसा, फटाके.. यातच गुंतून रहायचं का? निदान यापुढे तरी फडणवीसांनी प्रयत्न करायला हवेत,’’ अशा शब्दांत भुजबळांनी भूमिका स्पष्ट केली.

ठाकरेंनी जनतेची माफी मागावी

भाजपने ट्विट करत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यानेच ‘एअरबस टाटा’ गुजरातमध्ये गेला, असा आरोप भाजपने केला आहे. तसेच, भाजपने ट्विटची मालिका शेअर करत या प्रोजेक्टबद्दल खुलासा केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in