शिंदे गट, आम्ही एकच; मंत्री रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य

मविआच्या अंतर्गत वादामुळे सरकार पडले तर त्याचा दोष भाजपला देता येणार नाही
शिंदे गट, आम्ही एकच; मंत्री रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी उठाव केला. हे आमदार आता भाजपच्या वाटेवर असल्याची अफवा विरोधक त्यांच्याकडील शिल्लक आमदारही पळवले जातील, या भीतीने पसरवत आहेत. शिंदे गटातील आमदारांना भाजपमध्ये घेण्याचे कारण नाही, कारण आम्ही दोघे एकच आहोत, एकत्र सरकार चालवतोय, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री दानवे गुरुवारी जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मविआच्या अंतर्गत वादामुळे सरकार पडले तर त्याचा दोष भाजपला देता येणार नाही. शिवसेनेच्या आमदारांविरोधात पराभूत झालेल्यांना ताकद देण्याचे काम ‘मविआ’तील नेत्यांनी केले. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांनी उठाव केला. आम्ही सरकार पाडले नाही, यांच्या अंतर्गत वादामुळे सरकार पडले, त्यामुळे आम्हाला दोष देता कामा नये.

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून शिंदे गटातील नाराज आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना दानवे म्हणाले की, ‘आम्ही सरकार चालवत आहोत. आम्हाला उर्वरित काळ पूर्ण करून त्यापुढील ५ वर्षेही सरकार आणायचे आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज आहेत ही अफवा आहे. उद्धव ठाकरे गट, काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. आपल्याकडे असलेले आमदार पळू नयेत म्हणून ही अफवा त्यांनी सोडली आहे.’

भाजपने पाठिंबा दिल्याने शिंदे मुख्यमंत्री

‘हा संख्याबळाचा खेळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढली आणि त्यांच्याकडे संख्याबळ असले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. लोकशाहीत ज्याच्याकडे संख्याबळ तो राजा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्याकडे संख्याबळ असल्याने पदावर आहेत. एकनाथ शिंदे यांना भाजपने पाठिंबा दिल्याने ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे संख्याबळाला महत्त्व आहे. कुणाच्या बोलण्याने कुणीही मुख्यमंत्री होत नाही, असे म्हणत दानवे यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in