अनिलराज रोकडे/ वसई
राज्यातील सत्तातरानंतर शिवसेनेच्या शिंदे गटासोबत गेलेले पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले असून, राज्यातील आणि केंद्रातील पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीबद्दल दिलेला शब्द पाळला नाही, अशी भावना त्यांनी शुक्रवारी व्यक्त केली. मी आणि माझे कार्यकर्ते यांच्यासाठी हा अनपेक्षित निर्णय असून, त्यामुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. असे असले तरी महायुतीचा धर्म म्हणून आम्ही सर्व भाजप उमेदवार हेमंत सावरा यांच्या विजयासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याची भूमिका खासदार गावित यांनी स्पष्ट केली आहे. मतदारसंघातील भाजपकडून करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणात खा. गावित यांच्या विजयाला धोका असल्याचे संकेत मिळाल्याने तिकीट कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीमध्ये पालघरची जागा शिवसेना (शिंदे गट) किंवा भाजप अशी कुणाकडेही गेली, तरी उमेदवार म्हणून विद्यमान खासदार गावित यांना तिकीट मिळेल, असा सर्वत्र कयास बांधला जात होता. मात्र दोन आठवड्यांपासून पालघर जिल्हा भाजपमधून खासदार गावित यांच्या विषयीच्या नाराजीचे सूर तीव्र झाले होते. त्यांच्या विषयीची नाराजी वसई-विरार भाजपमधूनही व्यक्त झाली होती. परंतु ती शमविण्यात गावित यांना यश आले होते. जागा भाजपकडे गेल्यास कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची अनुकूलताही यापूर्वीच त्यांनी बोलून दाखवली होती.
चव्हाण यांनी खासदार गावित यांची भेट घेऊन, त्यांची विचारपूस केली. चव्हाण आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी गावित यांना येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे योग्य ते पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे. उमेदवारी नाकारल्याबद्दल तीव्र नाराज असलेले गावित पक्षश्रेष्ठींनी शब्द न पाळल्याबद्दलची नापसंती तसेच विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारणे कसे चुकीचे आहे, याबाबत प्रसारमाध्यमांकडे आज दुपारपर्यंत स्पष्ट बोलत होते. परंतु सायंकाळनंतर त्यांचा सूर सौम्य होत जाऊन, महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करू, असे प्रतिपादन करण्यापर्यंत बदललेला होता.
मूळचे नंदुरबार येथील असलेले गावित व्यवसायानिमित्त मीरारोड येथे आले. आपल्या कुंडलीत राजयोग असल्याप्रमाणे, गावित हे काँग्रेस पक्षातून राजकीय प्रवास सुरू करताना, २००९ साली पालघरचे आमदार झाले. काँग्रेस आघाडीच्या सत्ता काळात राज्यमंत्रीपदाची त्यांना संधीही त्यांना मिळाली. तीन निवडणुकात त्यांना पराभव ही पचवावा लागला. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालघरच्या २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांचा विजय होऊन, ते खासदार झाले. त्यानंतर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा ते खासदार झाले. मात्र यावेळी खासदारकीची हॅटट्रिक साधण्याची संधी त्यांना प्राप्त झाली नाही.
खासदार गावित यांचा सहभाग नव्हता
महायुतीतील अंतर्गत जागावाटपात ४८ पैकी ठाणे, नाशिक व पालघर हे तीन मतदारसंघ शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन निर्णय ताणले गेले. त्यातही ठाणे व नाशिक गुरुवारी दुपारपर्यंत मार्गी लागले. परंतु पालघर हा एकमेव मतदारसंघ मागे राहून राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. त्यात अखेर ही जागा भाजपच्या वाट्याला जाऊन, वाड्याचे माजी मंत्री स्वर्गीय विष्णू सावरा यांचे चिरंजीव हेमंत सावरा यांच्या गळ्यात महायुतीची माळ पडली आहे. पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे हेमंत सावरा यांची मिरवणूक काढण्यात येऊन, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या
मिरवणुकीत खासदार गावित सहभागी झाले नाहीत.