नाशिक राष्ट्रवादीकडे, रायगड सेनेकडे; पालकमंत्रिपदाबाबत शिंदेसेनेची भूमिका

राज्यात महायुतीला जनतेने कौल दिला आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यावेळी मंत्रिमंडळासह पालकमंत्री जाहीर केले. मात्र रायगड व नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा तेव्हापासून कायम आहे.
नाशिक राष्ट्रवादीकडे, रायगड सेनेकडे; पालकमंत्रिपदाबाबत शिंदेसेनेची भूमिका
Published on

मुंबई : रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे संख्याबळ अधिक असून रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे राहणार असून नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला द्या, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतली आहे. दरम्यान, महायुतीत तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असून नाशिकचे पालकमंत्रिपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सोडू, परंतु रायगडच्या पालकमंत्रीपदावर सेनेचा दावा कायम असून याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच योग्य तो निर्णय घेतील, असे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

राज्यात महायुतीला जनतेने कौल दिला आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यावेळी मंत्रिमंडळासह पालकमंत्री जाहीर केले. मात्र रायगड व नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा तेव्हापासून कायम आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या मंत्री आदिती तटकरे यांनी पालकमंत्रिपदावर दावा केला होता. तर शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनीही आपला दावा कायम ठेवला होता. मात्र रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा वाद चिघळत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. मात्र आता नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला देण्यास शिवसेनेने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपद शिवसेनेकडे राहणार, असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. त्यामुळे लवकरच पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशातच महायुतीत पालकमंत्रिपदावरून संघर्ष सुरू आहे. यावर तोडगा न निघाल्यास फटका बसण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पालकमंत्रिपदाचा वाद सोडविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. रायगड स्वतःकडे ठेवून नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यास शिवसेनेने तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्या स्तरावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in