शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली

गेल्या अडीच वर्षातील खदखद एकनाथ शिंदे यांनी चार मुद्द्यांच्या आधारे मांडली आहे
शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय भूकंप आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो आणि तुम्ही मुख्यमंत्री बना,’ अशी भूमिका बुधवारी फेसबुक लाइव्हद्वारे मांडली; मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची ही ऑफर नाकारली आहे.

गेल्या अडीच वर्षातील खदखद एकनाथ शिंदे यांनी चार मुद्द्यांच्या आधारे मांडली आहे. आपल्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात की, “गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला आणि यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे.”

स्वतंत्र गट स्थापनेसाठी ३६ आमदारांची गरज

एकनाथ शिंदे यांना स्वतःसह आपल्या समर्थक आमदारांवरील पक्षांतर बंदी कायद्यानुसार होणारी संभाव्य कारवाई टाळायची असेल तर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या ५६ आमदारांपैकी दोन तृतीयांश म्हणजे ३६ आमदारांचे समर्थन मिळवावे लागेल. शिंदे गटाकडे ३६ आमदार असतील तर त्यांच्या गटाला विधासभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळू शकेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी गटनेता बदलण्याचा निर्णय घेतला असेल तर तो अवैध ठरत नाही. गटनेता बदलासाठी आमदारांच्या सह्यांची गरज नाही. आता गटनेते पदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विधानसभा उपाध्यक्ष हेच निर्णय घेतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in