विशेष प्रतिनिधी/मुंबई
नाशिक लोकसभा मतदारसंघ यावेळी सर्वांत जास्त चर्चेत राहिला. कधी भाजपने दावा केला, तर कधी राष्ट्रवादीने आणि शिंदे गट तर ही जागा सोडायला तयारच नव्हता. त्यामुळे दावे-प्रतिदावे सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधून वेगळाच डाव टाकत नाशिक जिल्ह्यात मोठे प्रस्थ असलेल्या थेट शांतीगिरी महाराज यांनाच उमेदवारी देऊन सर्वच अंदाज चुकविले. त्यामुळे उमेदवारीसाठी सतत मुख्यमंत्र्यांच्या दारी धावत जाणारे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच शिवसेनेच्या इतर नेत्यांना झुलवत ठेवत मोठी खेळी खेळल्याने पक्षाचे नेते नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण नाशिक जिल्हा पिंजून काढला. वाजे यांना उमेदवारी दिल्याने ठाकरे गटात नाराजी असतानाच शिंदे गटातही विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि इतर बऱ्याच नेत्यांची नावे आली. तसेच भाजपच्या दिनकर पाटील यांनीही जिल्ह्यात जोरदार तयारी केली. परंतु सर्व अंदाज चुकवत बराच वेळ मारून नेत ऐनवेळी शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.
शांतीगिरी महाराजांनी सोमवारी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. आज झालेल्या घडामोडीअगोदर शांतीगिरी महाराज यांनी रविवारी रात्री थेट छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती. याचाच अर्थ शांतीगिरी महाराज यांना आधीच उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असावे, असे बोलले जात आहे. मात्र, कुठलीही वाच्यता न करता सोमवारी थेट शिंदे गटाने शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी दिली आणि मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला.
खरे तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून आतापर्यंत रोज नवी नावे येत होती. तसेच दावे-प्रतिदावेही सुरू होते. विशेष म्हणजे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी तर शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नव्हते. परंतु त्यांना विश्वास देऊन तयारी करायला लावली. परंतु नवनव्या चर्चेने त्यांनाही उमेदवारीबाबत विश्वास वाटत नव्हता. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना डावलून थेट शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी दिल्याचे समजते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांचे चिरंजीव आणि स्नुषा यांनाही भेटायला बोलावले होते.
लढायचे आणि जिंकायचे
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना शांतीगिरी महाराज यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आधीच भेट घेतली होती. त्यामुळे आमचे ठरले आहे. एबी फॉर्मबाबत आमचे वकील ठरवतील. मात्र जय बाबाजी परिवाराने आधीच निश्चय केला असून, आता लढायचे आणि जिंकायचे, असा निश्चय केला आहे, असे सांगितले. शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी दिल्याने नाशिकमधील लढतीला आता वेगळीच रंगत येणार आहे. परंतु महायुतील नेते किती प्रामाणिकपणे काम करतात, यावर गणित अवलंबून आहे.