
शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी भक्तांकडून नेहमीच सढळ हस्ते देणग्या दिल्या जातात. भक्तांच्या दानशूरपणामुळे साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे ५०० किलो सोने जमा झाले असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आता हे सोने ठेवायला जागा कमी पडत आहे.
साई संस्थानच्या तिजोरीत आतापर्यंत पाचशे किलो सोने जमा झाले असून यामध्ये दागिने स्वरूपातील सोने अधिक आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या भावात गेल्या काही वर्षात दुपटीने वाढ झाल्याने साई संस्थानच्या संपत्तीत तब्बल अडीचशे कोटी रुपयांची भर पडली आहे. सध्या भक्तांच्या सोने स्वरुपातील देणग्या ठेवण्यासाठी साई संस्थानकडे जागा कमी पडत आहे.
साई संस्थानकडे जमा असलेल्या सोन्याच्या साठ्यात शंभर किलो वजनाचे साई सिंहासन तसेच सुबक आणि मौल्यवान दागिन्यांचा समावेश असून, हे दागिने सुरक्षित ठेवावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. एकूण ५०० किलो सुवर्ण साठ्यापैकी सुमारे अडीचशे किलो सोने वितळवण्यायोग्य असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी सुमारे १४० किलो वजनाच्या वस्तू वितळवून त्यापासून सुवर्ण नाणी तयार करण्याचा निर्णय साई संस्थानने काही वर्षांपूर्वी घेतला होता. ज्याला हायकोर्टाचीही मान्यता मिळाली होती. मात्र, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
साई संस्थानने आतापर्यंत तीन वेळा आपल्याकडील सोन्याच्या वस्तू वितळवून सुवर्ण नाणी तयार केली आहेत. त्यापैकी सुमारे पाच किलो वजनाची नाणी अद्याप शिल्लक आहेत. दरवर्षी केवळ दोन ते तीन किलो सोन्याच्या नाण्यांचीच विक्री होते. हे पाहता नव्याने तयार करण्यात येणाऱ्या नाण्यांची विक्री होण्यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने जोखीमही वाढू शकते. त्यापेक्षा हे सोने स्टेट बँकेकडे ठेवावे, अशी मागणी संबंधित याचिकाकर्त्याने केली आहे.
सोने ठेवायला विस्तारीत जागेची गरज
संस्थानने स्टेट बँकेकडे सोने ठेवायला दिले, तर त्यावर त्यांना अडीच टक्के व्याज मिळू शकते. परंतु, ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने साई संस्थान कोंडीत सापडले आहे. ही परिस्थिती जर अशीच राहिली तर साई संस्थानला देणगी स्वरूपात येणारे सोने साठवण्यासाठी विस्तारीत जागेची तजवीज करावी लागणार आहे.