शिर्डी-तिरुपती प्रवास होणार सोपा; दोन्ही मार्गांवर १८ विशेष फेऱ्या, एकूण २८ ठिकाणी थांबे

श्री साईबाबा यांचे शिर्डी आणि श्री वेंकटेश्वर स्वामी यांचे तिरुपती यांना थेट रेल्वेने जोडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम रेल्वेने हाती घेतला आहे. या तीर्थस्थानी जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे.
शिर्डी-तिरुपती प्रवास होणार सोपा; दोन्ही मार्गांवर १८ विशेष फेऱ्या, एकूण २८ ठिकाणी थांबे
Published on

लासलगाव : श्री साईबाबा यांचे शिर्डी आणि श्री वेंकटेश्वर स्वामी यांचे तिरुपती यांना थेट रेल्वेने जोडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम रेल्वेने हाती घेतला आहे. या तीर्थस्थानी जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे.

साईनगर शिर्डी ते तिरुपती आणि तिरुपती ते शिर्डी अशा दोन्ही मार्गांवर प्रत्येकी ९ अशा एकूण १८ विशेष फेऱ्या होणार असून या गाड्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत साप्ताहिक स्वरूपात सुरू राहणार आहेत. या गाड्यांना कोपरगाव, मनमाड, छत्रपती संभाजी नगर, परभणी, परळी वैजनाथ, बीदर, सिकंदराबाद, गुडूर, रेणिगुंटा आदी महत्त्वाच्या स्थानकांसह एकूण २८ ठिकाणी थांबे असणार आहेत.

या गाड्यांमध्ये २ एसी, ३ एसी, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणी मिळून एकूण १८ डब्बे असतील. या विशेष उपक्रमामुळे श्री साईबाबा व श्री वेंकटेश्वर स्वामी यांचे दर्शन एकाच प्रवासात शक्य होणार असून, दक्षिण व पश्चिम भारतातील धार्मिक पर्यटनाला त्यामुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

गाड्यांची रूपरेषा

शिर्डीहून तिरुपतीकडे जाणारी गाडी क्र. ०७६३८ दर सोमवार ४ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर दरम्यान रात्री ७.३५ वाजता साईनगर शिर्डी येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे १.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे तिरुपतीहून शिर्डीकडे येणारी गाडी क्र. ०७६३७ दर रविवार ३ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर दरम्यान पहाटे ४.०० वाजता तिरुपतीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता साईनगर शिर्डी येथे पोहोचेल.

logo
marathi.freepressjournal.in