धर्मवीरांचा गड मुख्यमंत्री सोडणार नाहीत असा शिवसैनिकांना विश्वास; नाईक यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटात खळबळ

रविवारी रात्री भाईंदरच्या बालाजी नगरमधून माजी खासदार संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करत असल्याचे एका बैठकीत सांगितले होते . पक्षाने आपल्याला प्रचार सुरू करण्यास सांगितले असून ९९ टक्के आपली उमेदवारी निश्चित झाली आहे.
धर्मवीरांचा गड मुख्यमंत्री सोडणार नाहीत असा शिवसैनिकांना विश्वास;  नाईक यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटात खळबळ
Published on

भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजीव नाईक यांनी आपण पक्षाच्या निर्देशानुसार प्रचाराला सुरुवात केल्याचे तसेच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण देखील असू शकते, असे वक्तव्य केल्याने शिवसेना शिंदे गटात खळबळ उडाली आहे. सेनेच्या पदाधिकारी पासून शिवसैनिकांनी ठाण्याचा लोकसभा मतदार संघ हा धर्मवीर आनंद दिघे यांनी खेचून घेतला होता. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिघे हे ठाणे म्हणजे शिवसेनेचा गड मानायचे. त्यातही सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला असताना देखील हा मतदारसंघ भाजपाला सोडणे वा भाजपातून उमेदवार आयात करणे म्हणजे शिवसेनेची नामुष्की ठरणार असल्याचा संताप शिवसैनिक व्यक्त करत आहेत .

रविवारी रात्री भाईंदरच्या बालाजी नगरमधून माजी खासदार संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करत असल्याचे एका बैठकीत सांगितले होते . पक्षाने आपल्याला प्रचार सुरू करण्यास सांगितले असून ९९ टक्के आपली उमेदवारी निश्चित झाली आहे. निवडणूक चिन्ह मात्र धनुष्यबाण देखील असू शकते असे सूचक वक्तव्य करतानाच आपल्याला मात्र कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची असल्याचे नाईक म्हणाले .

आधीच ठाण्याचा तिढा अजून सुटलेला नसताना नाईक यांच्या प्रचार आणि वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतापसरली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघ हा धर्मवीर आनंद दिघे यांनी खेचून आणला होता व १९९६ पासून तो सेनेचा गड मानला जातो. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक खासदार झाले होते. पण २०१४ च्या निवडणुकीत सेनेच्या राजन विचारे यांनी नाईकांचा पराभव केला होता . २०१९ च्या निवडणुकीत खा. विचारे हे विक्रिमी मताधिक्याने निवडून आले होते व आताची हि त्यांची तिसरी लोकसभेची निवडणूक आहे.

भाजपा ठाण्याचा लोकसभा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असून दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातून  आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक व माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा सुरु आहे . भाजपा कडून माजी खासदार व ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी मध्यंतरी तयारी चालवली होती पण ते आता शर्यतीतून मागे पडून संजीव नाईक यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीचे मेळावे घेण्यास सुरवात केली असली तरी त्यांनी स्वतःहून आपण इच्छूक असल्याचे जाहीर केलेले नाही. तसे असले तरी ठाणे शिवसेनेचे असून ठाण्याचा उमेदवार हा शिवसैनिकच असावा, असे शिवसैनिकांनी बोलून दाखवले.

logo
marathi.freepressjournal.in