मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आधी ५० हजार योजनादूत तर आता १ लाख सोशल सैनिक प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवण्याचे ठरवले आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हे सोशल सैनिक विधानसभेच्या प्रचारात उतरणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजेल. यंदाची निवडणूक विशेष करुन महायुती व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे मविआ असो वा महायुती आपल्या परीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या सोशल सैनिकांची फौज मैदानात उतरली आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्रमात सोशल सैनिकांना मार्गदर्शन केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवसेना सोशल आवाज या कार्यक्रमात जनतेपर्यंत पोहोचण्याची रूपरेषा सांगत डॉ. शिंदे यांनी सैनिकांचा उत्साह द्विगुणित केला. आतापर्यंत कोणत्याही सरकारने कमी काळात इतकी लोकाभिमुख कामे केली नाहीत, जेवढी कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती
सरकारने केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसिध्दी माध्यमात इलेक्ट्रॉनिक माध्यमासह सध्या डिजिटल समाज माध्यम अतिशय प्रभावशाली आणि संवेदनशील असून याचा वापर कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी ही करावा, अशी सूचनाही ही केली. युवासेनेचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचेही मार्गदर्शन यावेळी उपस्थित हजारो सोशल सैनिकांना मिळाले. अतिशय कमी वेळेत नेमका हॅशटॅग वापरून लाखो लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल, याची माहितीही सरनाईक यांनी यावेळी दिली.
नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी प्रभावी वापर - देवरा
शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख राहुल कनाल यांनी खासदार मिलिंद देवरा यांची या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत सोशल सैनिकांसाठी पर्वणी ठरली. या मुलाखतीतून देवरा यांनी सोशल मीडियाचा आवाका आणि परिणाम स्पष्ट करून सांगितला. भारतात सध्या ५३ टक्के लोक इंटरनेट सोबत जोडलेले आहेत. तसेच समाज माध्यम हे संवादासाठी दुहेरी माध्यम उपलब्ध करत असून विरोधकांचे खोटे नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी याचा प्रभावी वापर करता येईल, असे देवरा यांनी यावेळी सांगितले. तर आलेल्या सूचनांनुसार आवश्यक ते बदल केले जातील, असे आश्वासन कनाल यांनी यावेळी दिले.
शिवसेनेचे २५० सोशल मीडिया मॅनेजर
शिवसेनेच्या वतीने काही विशिष्ट विधानसभा मतदारसंघात सोशल मीडिया मध्यवर्ती सेंटर उभारले जाणार असून २५० सोशल मीडिया मॅनेजर नियुक्त केले जाणार आहेत. या माध्यमातून कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत सकारात्मक पद्धतीने कसे पोहोचायचे याचे मार्गदर्शन लाभणार आहे. समाज माध्यमांवर प्रचलित असलेले व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमाद्वारे सरकारने केलेली लोकाभिमुख काम जनतेपर्यंत पोहचवली जाणार आहेत. शिवसैनिक हा प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले.