‘लाडकी बहीण’वरून शिवसेना, राष्ट्रवादीत तू-तू मैं-मैं

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हे नाव वगळत अजित पवार लाडकी बहीण योजना असे प्रसिद्ध केल्याने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये तू-तू मैं-मैं झाल्याची चर्चा आहे.
‘लाडकी बहीण’वरून शिवसेना, राष्ट्रवादीत तू-तू मैं-मैं
Published on

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हे नाव वगळत अजित पवार लाडकी बहीण योजना असे प्रसिद्ध केल्याने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये तू-तू मैं-मैं झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले.‌ दरम्यान, अजित पवार यांना त्रास होत असल्याने त्यांना आराम करायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातील महिलांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने भाजप आमदार रवी राणा यांनी मतदान करा अन्यथा पैसे परत घेऊ असे विधान केले आणि एकच वादंग उठला. तर आता अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत अजित पवारांची लाडकी बहीण अशी जाहिरात प्रसिद्ध केल्याने लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यातच गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना मंत्री मंडळाच्या बैठकीत रंगल्याचे समजते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर हा वाद शमल्याचे समजते.

प्रत्येक वेळी महायुतीत कोणतेही खटके उडू नयेत म्हणून आम्ही या भूमिकेत असतो. परंतु पुन्हा पुन्हा तेच होत असेल, एखाद्या बॅनरवर लाईन आली तर समजू शकतो. पण जाणूनबुजून मुख्यमंत्री हा शब्द नसावा हा अट्टाहास कशाला हवा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपल्या सरकारचं यश आहे. सर्वजण मिळून करत आहोत, पण मग एकच वादा, दादा का वादा हे का. पक्षाच्या कार्यक्रमात या घोषणा चालतात.

- संजय शिरसाठ, शिंदे गटाचे नेते

शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी कॅबिनेट मीटिंगमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना मुख्यमंत्र्यांचं नाव वापरलं जात नसल्याचा आक्षेप घेतला. अजित पवारांची जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यक्रम आहे. त्यात जर कधी शॉर्टकटमध्ये नाव घेतलं तर काय बिघडलं? अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्यभर ‘अनाथांचा नाथ.. एकनाथ’ असे बॅनर लागले. तेव्हा आम्ही म्हटलं का? अजित पवारांचं नाव का नाही घेतलं?

- उमेश पाटील, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

निधी वळविल्याचा आरोप फेटाळला 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  योजनेसाठी इतर योजनांचा निधी वळवण्यात आल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात येणारा निधी या योजनेत सरकारने वळवल्याचेही वृत्त होते. मात्र, सरकारने हे वृत्त फेटाळले असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर, स्वयंस्पष्ट आदेश काढण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in