
बुलढाणामध्ये शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमात सर्वत्र एकच गोंधळ झाला. या गोंधळाची तीव्रता पाहता जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शिंदे गटाचे समर्थक आणि ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाल्याचे दिसून आले. हा राडा आटोक्यात आणण्यासाठी अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
नेमकं काय आहे प्रकरण ?
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शिवसेनेचा सत्कार सोहळा सुरू असताना आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. संजय गायकवाड यांचा मुलगा आणि त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील नवोदित पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र गायकवाड यांच्या समर्थकांनी आम्ही शिवसेनेचेच लोक असल्याचा दावा करून संभ्रम निर्माण केला. यावेळी बाचाबाची झाली आणि पोलिसांसमोर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करून संपूर्ण प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.