शिवसेना-भाजप एकत्रच लढणार -मुख्यमंत्री

आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेना-भाजप युती एकत्रितच लढविणार
File photo
File photo

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना-भाजप महायुती एकत्रितच लढविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तार, निवडणुका आदींबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांबाबतही त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी संध्याकाळी दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांनी दीर्घ चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळ विस्तार, आगामी निवडणुका तसेच राज्यातील विविध प्रकल्प यासंदर्भात या भेटीत महत्त्वाची चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, ‘‘मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच विस्तार करण्यात येईल. आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेना-भाजप युती एकत्रितच लढविणार आहोत. मुंबई महापालिका तसेच राज्यात आरपीआय देखील आमच्या सोबतच असणार आहे. आम्ही सोबत पूर्ण ताकदीने निवडणुका लढविणार आहोत. तसेच बहुमताने जिंकणार देखील आहोत.’’

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘शिवसेना-भाजप युतीचे सरकार गेले ११ महिने अतिशय एकजुटीने काम करत आहे. आम्ही अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. आमची युती वैचारिक आहे. राज्यातील अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सरकारमध्ये किंवा युतीत कोणतेही मतभेद नाहीत. तसे आरोप करणाऱ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आधी अडीच वर्षे स्पीडब्रेकर होते. पण, आता मुंबईसह राज्यभरात अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत,’’ असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in