शिवनेनेचे दोन्ही गट एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाई संबंधीत सुनावणीला आज सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असलेल्या या सुनावनीवेळी शिंदेगटाने ठाकरे गटाकडून आम्हाला कागदपत्रे मिळाली नसल्याचं सांगत वेळ वाढवून देण्याची मागणी केली गेली. यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप नोंदवला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी मात्र हा वेळकाढूपणा असल्याचं म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोर आज शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु झाली. कोर्टात वकिल जशा फिर्यादी आणि आरोपींच्या बाजू मांडतात तशा पद्धतीने आज बाजू मांडण्यात आल्या. यावेळी जवळपास २२ याचिकांवर चर्चा झाली. यात आमचे १६ आणि बाकीच्या त्यांच्या याचिकांपैकी काही क्लब केल्या होत्या. दरम्यान, आमच्या गटाकडून लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी समोरच्या बाजूच्या वकिलांनी आम्हाला वेळ पाहीजे असं सांगितलं., असं ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर म्हणाले.
वायकर पुढे बोलताना म्हणाले की, काही लोकांनी दोन आठवड्यांचा, काहींनी दहा दिवसांचा वेळ मागून घेतला. म्हणजे यात वेळकाढू पणा दिसून आला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात सुनिल प्रभू व्हीप असल्याचं सरळ सरळ सांगितलं आहे. गोगावलेंना योग्य ठरवलेलं नाही. त्यामुळे सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपच्या विरोधात जाऊन त्यांनी नार्वेकरांना अध्यक्ष म्हणून मतदान केलं. यावर निर्णय घ्यायचा आहे. पण हा वेळकाढूपणा सुरु आहे. त्यांना फक्त दिवस पुढे ढकलायचे आहे. असा आरोप रविंद्र वायकर यांनी केला.
सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत तीन महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण हे प्रकरण त्याच्या पुढे जाईल असं वाटत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशावर लकरात लवकर कारवाई करावी, अशी विरोधातील सर्व आमदारांची मागणी आहे, असं वायकर म्हणाले.