शिवसेना नाव, चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली.
शिवसेना नाव, चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट
Published on

नवी दिल्ली : दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० दिवसांपूर्वी सादर केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी करताना न्या. सूर्य कांत, न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील, असे सांगत ऑगस्टमध्ये त्यावर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी पुढील महिन्यात होणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अर्जावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायाधीशांनी मुख्य याचिकेवरच आपण सुनावणी घेऊया, असे सांगत ऑगस्टमध्ये सुनावणी करू, असे सांगितले. तसेच पुढील २-३ दिवसांत सुनावणीची तारीख देऊ, असे स्पष्ट केले. जर ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणावर निकाल येऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याआधी झाल्या तर 'जैसे थे' परिस्थिती असेल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीप्रमाणे निर्णय द्यावा!

न्या. सूर्य कांत, न्या. बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. ज्याप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत कोर्टाने तात्पुरता निर्णय दिला होता, ज्यात अजित पवारांना पक्षचिन्हाबाबत सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असा उल्लेख करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर निर्णय द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला होता, त्यावर आज सुनावणी झाली. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुकुल रोहतगी, तर उद्धव ठाकरे यांच्यावतीने कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर बाजू मांडली.

सुनावणीत काय घडले?

हे प्रकरण २ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याची सुनावणी ऑगस्टमध्ये घेऊ, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. वेळापत्रक पाहून १-२ दिवसांत ऑगस्टमधील तारीख देण्यात येईल, असे न्या. सूर्य कांत यांनी म्हटले. ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाल्यास पुढील ३ महिन्यांत या प्रकरणाचा निकाल लागू शकतो. या प्रकरणाला २ वर्षे झाली असून त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे, असे संकेतच सुप्रीम कोर्टाने सोमवारच्या सुनावणीत दिले.

logo
marathi.freepressjournal.in