शिवसेना पक्ष, चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या निकालाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे.
शिवसेना पक्ष, चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर
Published on

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या निकालाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. त्यानंतर आता या याचिकेवर सुनावणी पुढच्या तारखेला होणार आहे. मात्र ती सुनावणी नेमक्या कोणत्या तारखेला होणार आहे हे अद्याप निश्चित नसून सर्वोच्च न्यायालयाकडून दोन्ही पक्षकारांना त्याबाबत कालांतराने माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील गुरुवारची सुनावणी संपली. यादरम्यान, शिवसेनेकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून म्हणजे ठाकरे आणि शिंदे गटाकडून अंतिम युक्तिवादाची तयारी दर्शवण्यात आली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता त्यावर पुढच्या तारखेला सुनावणी होईल, असे स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या अंतिम युक्तिवादासाठी पुढची तारीख ही उपलब्धतेनुसार देण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दोन्ही बाजूंचा लेखी युक्तिवाद वाचून पुढील तारीख निश्चित करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आयोगाच्या निर्णयाला आव्हान

शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २०२२ मध्ये एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

स्वतंत्र सुनावणी

ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणातील निकालाचा दाखला देत युक्तिवाद केला, जेथे अजित पवार गटाला चिन्ह वापरताना जाहीरपणे स्पष्ट करावे लागले की त्यांचा तात्पुरता वापर आहे. शिवसेना फुटीशी संबंधित आमदार अपात्रता प्रकरणात, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जानेवारी २०२४ मध्ये शिंदे गटाला "खरी शिवसेना" म्हणून मान्यता दिली. ठाकरे गटाने या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, परंतु त्याची सुनावणी स्वतंत्रपणे सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in