डुप्लिकेट शिवसैनिकांना ठाकरे गटाकडून उमेदवारी; किरण पावसकर यांची टीका

सांगलीत उबाठा गटाने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांना डावलून अगदी काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्या चंद्रहार पाटील यांना तिकिट देण्यात आले.
डुप्लिकेट शिवसैनिकांना ठाकरे गटाकडून उमेदवारी; किरण पावसकर यांची टीका

प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिली आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून पक्षकार्य केले, अशा जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांऐवजी इतर पक्षातून बंडखोरी करून आलेल्या डुप्लिकेट शिवसैनिकांना उबाठा गटाने उमेदवारी दिल्याने उद्धव ठाकरे यांचा धूर्त चेहरा उघडा पडल्याची टीका शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली आहे.

कल्याण मतदार संघासाठी वैशाली दरेकर-राणे यांची उमेदवारी उबाठा गटाने जाहीर केली. वैशाली दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता. “निष्ठावान शिवसैनिकांना डावलून उबाठा गटाकडून आयात उमेदवारांना तिकिटे वाटण्याचे काम केले जाते. आज जळगावमधील भाजपचे नेते उन्मेष पाटील, करण पवार यांना उबाठा गटाने पक्ष प्रवेश दिला. करण पवार यांना उबाठा गटाकडून जळगावची उमेदवारी दिली आहे. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले करण पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांनी उबाठा गटात प्रवेश केला. निवडणुकीच्या तिकिटवाटपात उद्धव ठाकरे कोणत्या थराला जातात, हे यातून दिसून आले,” अशी टीका पावसकर यांनी केली.

सांगलीत उबाठा गटाने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांना डावलून अगदी काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्या चंद्रहार पाटील यांना तिकिट देण्यात आले. यवतमाळ वाशिममधील उबाठा गटाचे उमेदवार हेदेखील आयात उमेदवार आहेत. अपक्ष आमदार संजय देशमुख यांनी काहीच दिवसांपूर्वीच उबाठात प्रवेश केला होता.

मावळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना डिसेंबर महिन्यात उबाठा गटाने पक्षात घेतले होते. अवघ्या तीन महिन्यात संजोग वाघेरे यांना उबाठा गटाने मावळची उमेदवारी दिली. भाऊसाहेब वाघचौरे यांना पुन्हा उबाठा गटाने पुन्हा पक्षप्रवेश देत शिर्डीची उमेदवारी दिली.

ईशान्य मुंबईतून उबाठा गटाने संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. संजय दिना पाटील मूळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ईशान्य मुंबईचे खासदार होते. उबाठा गटाने आयात उमेदवारांना खासदारीचे तिकिट देऊन निष्ठावान शिवसैनिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. यामुळे उबाठात उरले सुरलेले कार्यकर्तेही जय महाराष्ट्र करतील, असा विश्वास पावसकर यांनी व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in