मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच राजकीय पक्ष जागावाटपात आपल्या पदरात जास्त जागा पडाव्यात म्हणून प्रयत्न करू लागले आहेत. शिवसेनेने (शिंदे गट) २०१९ साली लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर २२ जागा लढविल्या होत्या. आता देखील तेवढ्याच २२ जागा मिळाव्यात म्हणून आग्रही असल्याचे शिवसेनेचे मंत्री (शिंदे गट) शंभूराज देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून याबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील, असेही ते म्हणाले.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई म्हणाले, मागच्या वेळी म्हणजेच २०१९ साली शिवसेना २२ जागांवर लढली होती आणि त्यातील १८ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळीसुद्धा आम्ही २२ जागांसाठी आग्रही आहोत. लवकरच याबाबतीत अंतिम निर्णय तिन्ही पक्षातील प्रमुख नेते मिळून घेतील. आमच्या महायुतीत चांगले वातावरण आहे आणि कोणीही नाराज नाही. एखाद्या पक्षाने किंवा नेत्याने एखादी जागा मागणे किंवा त्यासाठी आग्रह करणे म्हणजे नाराजी नव्हे. ती त्यांची मागणी आहे. त्यावर बैठकीत चर्चा होऊन योग्य तो मार्ग काढला जाईल. कोणी ही नाराज होणार नाही, असे देसाई म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणूक महायुती म्हणजेच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र मिळून लढणार आहेत हे नक्की झालेले आहे. कोणता पक्ष किती जागा आणि कोणत्या जागा लढवणार आहे, हे लवकरात लवकर अंतिम होईल. प्रत्येक पक्षाच्या समन्वय समितीच्या बैठका झालेल्या आहेत. त्यांनी अहवालही सादर केलेला आहे. परंतु, अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या पक्षाची काळजी करावी!
भाजपने पहिल्या यादीत नितीन गडकरी यांना उमेदवारी न दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आधी स्वतःच्या पक्षाची आणि उमेदवारांची काळजी करावी. भाजपसारख्या मोठ्या पक्षावर त्यांनी बोलू नये. कोणाला उमेदवारी द्यायची तो त्यांचा भाजपचा प्रश्न आहे, ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे उरलेले ५-६ आमदार आणि २-३ खासदार आहेत त्यांची काळजी करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.