आदित्य ठाकरे बर्फामध्ये कोणासोबत खेळत होते? दावोस दौऱ्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे गेले आहेत. या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.
आदित्य ठाकरे बर्फामध्ये कोणासोबत खेळत होते? दावोस दौऱ्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा निशाणा

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना तसेच ते आजारी असतानाही त्यांना सोडून आदित्य ठाकरे हे दावोसला गेले होते. दौरा संपूनही ते लवकर परतले नाहीच; मात्र त्यानंतर ते बर्फामध्ये कोणासोबत खेळत होते, असा प्रश्न म्हस्के यांनी ठाण्यात झालेल्या जाहीर पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या दौऱ्याला वास्तविक उद्योग मंत्र्यांनी जाणे अपेक्षित होते; मात्र उद्धव ठाकरेंकडे हट्ट करून आदित्य ठाकरे दावोसला गेले होते? असा आरोपही म्हस्के यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे गेले आहेत. या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर टीका केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर कठीण शस्त्रक्रिया होणार होती. अशा काळात मुलाने त्यांच्या जवळ असणे अपेक्षित होते. पण, अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे हे दावोस दौऱ्यावर निघून गेले होते. दौरा संपल्यानंतरही ते काही दिवस तेथून परतलेच नव्हते. ज्यांचा उद्योगाशी संबंध नाही, अशा लोकांना घेऊन ते तिथे गेले होते. त्यामुळे ते तिथे कुणाबरोबर बर्फात खेळत होते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

‘त्यांना’ स्मृतिभ्रंश

महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी दावोस येथे उद्योग मंत्र्यांनी जाणे अपेक्षित होते. पण, त्यावेळेस आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री असतानाही दावोसला गेले होते. लहान मुले खाऊसाठी हट्ट करतात, तसा हट्ट करून ते दावोसला गेले होते. याचा त्यांना विसर पडला असून, त्यांना स्मृतिभ्रंश झाल्याची टीका म्हस्के यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in